बुडाचा अजब कारभार : कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन ठिकाणी उभारणार स्वागत कमानी; दहा लाखांचा निधी खर्च
प्रतिनिधी / बेळगाव
बुडाची स्थापना शहर विकासासाठी करण्यात आली आहे. मात्र, शहराचा विकास करून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी विकासाच्या नावावर सुशोभिकरण करण्याचा सपाटा बुडा प्रशासनाने चालविला आहे. राष्ट्रीय महामार्गापासून कार्यालयापर्यंतच्या रस्त्याशेजारी कचऱयाचा ढिगारा साचला आहे. मात्र, प्रवेशद्वारावर स्वागत कमानी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता दहा लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे.
बुडाच्या निधीमधून विकासकामे राबविणे आवश्यक आहे. मात्र, विकासकामाऐवजी शहराच्या सुशोभिकरणावर भर देण्याचा सपाटा बुडा प्रशासनाने चालविला आहे. याकरिता कोटय़वधी रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे. शहर व्याप्तीमधील तसेच बुडाच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरण करण्याची आवश्यकता आहे. मात्र, याकडे बुडा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. राष्ट्रीय महामार्ग ते बुडा कार्यालयाला जोडणाऱया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची गरज असताना डांबरीकरण करण्याऐवजी प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभ्या करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ते बुडा कार्यालयापर्यंतच्या तलावाशेजारील रस्त्यावर कचऱयाचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्ता खराब झाल्याने परिसर पूर्णपणे अस्वच्छ बनला आहे. मात्र, या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रीय महामार्गाशेजारी भव्य स्वागत कमान उभारण्यात येत आहे. फूल मार्केटजवळील प्रवेशद्वारावरही स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. बुडा कार्यालयामार्फत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. ही बाब चांगली असली तरी कार्यालयाजवळ दुर्गंधी आणि कचरा साचला असून रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. पण बुडा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
स्वागत कमानी उभारण्यासाठी सहा लाखांचा निधी खर्च करण्यात येत असून आकर्षक नामफलक उभारण्यात येणार आहेत. याकरिता तीन लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. स्वागत कमान उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.









