शरीराचा कोणताही भाग दुखत असेल तर त्याकडे सामान्य नजरेतून पाहिले जाते. परंतु अनेकदा हे दुखणे गंभीर आजाराचे संकेतही असू शकतात.
रब्डोमायोलेसिस देखील हा अशाच प्रकारचा आजार आहे. हा आजार स्नायूला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लागलेल्या मारामुळे होतो. मसल फायबर मृत झाल्यानंतर आणि त्यापासून निघणारे प्रोटिन हे रक्तप्रवाहात मिसळल्याने समस्या
निर्माण होते. स्नायू पेशींच्या ब्रेकडाऊनमुळे रक्तप्रवाहात
मायोग्लोबिन प्रवाहित होऊ लागते. जर रक्तात मायोग्लोबिनचे प्रमाण खूपच राहिले तर मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते.
प्रमुख लक्षणे
- सामान्यरुपाने हे दुखणे मांडी आणि कंबरेखालच्या भागात होते. यामध्ये स्नायू कमकुवत वाटणे, हात पाय हलवण्यास अडचणी, लघवीचा रंग हा लालसर-भूरकट होणे किंवा कमी लघवी येणे अशी लक्षणे आढळतात.
- ही समस्या ट्रॉमेटिक आणि नॉन ट्रॉमेटिक किंवा दोन्ही कारणांमुळे होऊ शकते. ट्रॉमेटिक श्रेणीत रस्ते अपघात, घसरुन पडल्याने लागलेला मार किंवा विजेचा धक्का किंवा साप, विंचू चावल्याने पसरणारे विष आदी कारणे असू शकतात.
- नॉनट्रॉमेटिक कारणात मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन, कोकेन सेवन, अँटीसायोटिक्स किंवा स्टॅटिन औषध अधिक प्रमाणात घेणे आदींचा समावेश आहे.
- या आजारावर उपचार करताना सर्वात अगोदर रुग्णांची लक्षणे तपासली जातात.
- क्रिएटिनचे प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्ताची, तर मायोग्लोबिनचे प्रमाण जाणून घेण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. वेळेत उपचार केल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
- शरीरात पुरेशा प्रमाणात पातळ पदार्थ असणे, हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. रुग्णालयात असताना बायकार्बोनेट युक्त तरल द्रव्य लावण्यात येते. परिणामी किडनीतून मायोग्लोबिन बाहेर पडू शकते. किडनीची क्रिया योग्य राहण्यासाठी डॉक्टर काही औषधी देऊ शकतात. गरज पडल्यास डायलिसीसही करावे लागते.
– डॉ. महेश बरामदे









