कॅन्टोन्मेंट कार्यालयात कक्ष उपलब्ध करण्याची मागणी : कक्ष नसल्याने नागरिकांना सदस्यांच्या घरापर्यंत धाव घ्यावी लागते
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात लोकनियुक्त सदस्यांना बसण्यासाठी कक्ष नसल्याने अधिकाऱयांच्या टेबलावर किंवा नागरिकांसाठी असलेल्या खुर्च्यावर बसावे लागते. मात्र आता अशीच स्थिती सरकारनियुक्त सदस्यांची झाली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट कार्यालयात कामकाज करण्यासाठी कक्ष उपलब्ध करून द्यावे, अशा विनंतीचे पत्र सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे दिले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत मागील वषी फेब्रुवारी महिन्यात संपली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून स्टेशन कमांडंट, कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकारनियुक्त सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सरकार नियुक्त सदस्य म्हणून सुधीर तुपेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण कॅन्टोन्मेंटमधील नागरिकांची कामे करताना संपर्क होत नसल्याने अडचणी येत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात कक्ष उपलब्ध असल्याने ठराविक वेळेत नागरिकांच्या समस्या जाणून घेणे सोयिस्कर होईल. पण कॅन्टोन्मेंट कार्यालयात बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने कार्यालयाच्या व्हरांडय़ात बसण्याची वेळ आली आहे.
लोकनियुक्त सदस्यांची गैरसोय
लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतरही याठिकाणी लोकनियुक्त सदस्यांना बसण्यासाठी सुविधा नाही. त्यामुळे त्यांचीदेखील गैरसोय होते. लोकनियुक्त सदस्यांकडे तक्रार करण्यासाठी नागरिकांनी सदस्यांच्या घरापर्यंत धाव घ्यावी लागते. जर सदस्य घरी नसल्यास फेऱया माराव्या लागतात. त्यामुळे कार्यालयात कक्ष उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. पण कक्ष उपलब्ध करून देण्यात आले नाही. परिणामी सदस्यांची गैरसोय होत असते. तसेच आता सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनादेखील ही समस्या भेडसावत आहे. जर कॅन्टोन्मेंट कार्यालयात सरकार नियुक्त सदस्यांचे संपर्क कार्यालय उपलब्ध असल्यास नागरिकांना ठराविक वेळेत भेट घेवून समस्या मांडता येवू शकते. पण कॅन्टोन्मेंट परिसरात कक्ष नसल्याने नागरिकांना सरकारनियुक्त सदस्यांच्या घरापर्यंत धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात कक्ष उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांच्याकडे करण्यात आली आहे.









