अमराई येथे जिल्हा शिक्षक संघाची सभा संपन्न
प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका अध्यक्षांच्या उपस्थितीत नुकतीच अमराई सांगली येथे संपन्न झाली. जिल्ह्यातील उपस्थित जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्ष यांची शिक्षक संघाची पुढील दिशा व येणाऱ्या बँक निवडणुकी बाबत मते जाणून घेण्यात आली. बँक सभासदांच्या आणखी हिताचा कारभार करण्याच्या दृष्टीने समविचारी संघटनांशी चर्चा करून युती करावी, असे मत उपस्थित सर्व तालुकाअध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शिक्षक बँकेच्या येणाऱ्या निवडणुकीत समविचारी संघटना यांना सोबत घेऊन शिक्षक बँकेची निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील वाडी वस्तीवरील शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याचे यशस्वी प्रयत्न तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिनी हे शिक्षक संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शिक्षक संघ हा गेली दहा वर्षे बँकेच्या सत्तेपासून दूर असुन शिक्षक संघ हा येणाऱ्या काळात सत्तेत असावा, ही भूमिका आता सामान्य शिक्षक सभासदांमधून व्यक्त होत असल्याने शिक्षक सभासदांच्या आणखी हिताचा कारभार करण्याच्या दृष्टीने शिक्षक बँकेच्या या निवडणुकीत समविचारी संघटनांना सोबत घेऊन बँक निवडणूक लढविणार असल्याची चर्चा यावेळी सर्वानुमते करण्यात आली. समविचारी संघटनांशी चर्चा करण्याचे सर्व अधिकार धैर्यशील पाटील यांना देण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष विजयकुमार चव्हाण, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य मधुकर जंगम, जिल्हा नेते जगन्नाथ कोळपे, जिल्हाध्यक्ष अमोल माने, जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप खोत, जिल्हा कोषाध्यक्ष मारुती देवडकर, तालुका अध्यक्ष प्रताप गायकवाड, विजय साळुंखे, नंदकुमार कुट्टे, बाळू गायकवाड, यशवंत गोडसे, धनाजी साळुंखे, भीमराव पवार, संजय खरात, सत्यजित यादव, बाबासाहेब वरेकर, महम्मदअली जमादार, सुधीर पाटील, मल्लिकार्जुन माळी, बसाप्पा पुजारी, सचिन खरमाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.








