गोवा फॉरवर्डच्या बैठकीत मागणीचा ठराव
प्रतिनिधी/ पणजी
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधी सर्व राजकीय पक्षांनी ’टीम गोवा’ म्हणून एकत्र येणे आणि या गोंयकारविरोधी सरकारचा पाडाव करणे ही काळाची गरज आहे, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आमदार वाढविण्यापेक्षा गोंयकारवादी सरकार घडविणे हे आमचे ध्येय असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी पणजीत झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारणी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांनी प्रत्येक तीन महिन्यात आपल्या राज्य कार्यकारणीची बैठक घेणे अनिवार्य केले आहे. त्याचाच भाग म्हणून फॉरवर्डची बैठक आयोजित करण्यात आली होती, असे ते म्हणाले. आमदार विनोद पालयेकर वगळता अन्य सर्व कार्यकारी सदस्य व पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
’टीम गोवा’ घडविणे ही काळाची गरज असून सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे व विद्यमान सरकारला सत्तेबाहेर फेकावे, ही लोकांची भावना असल्याचे सरदेसाई म्हणाले. टीम गोवा घडविण्यामागील प्रमुख घटक हे राजकीय पक्ष नसतील तर भावी पिढीसाठी गोवा व गोंयकारपण सांभाळून ठेवण्याचे ध्येय बाळगणारे गोमंतकीय असतील, असेही त्यांना स्पष्ट केले.
पुढील सरकार कोणाचे असेल, मुख्यमंत्री कोण असेल? याचा विचार करण्यापेक्षा गोव्याच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे यासाठी गोवा फॉरवर्ड निश्चितच पुढाकार घेईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.
स्वतःला भाजपविरोधी असल्याचा दावा करणाऱया प्रत्येकाने टीम गोवाचा भाग बनावे व भाजप सरकारला सत्तेबाहेर करावे. सध्या भाजपला वरकरणी विरोध करणाऱयांचा खरा चेहरा वेगळाच असून भाजपविरोधी मतांची विभागणी करणे व शेवटी भाजपलाच सत्तास्थानी बसविणे हा त्यांचा डाव आहे. परंतु त्यांचा हा कावेबाजपणा न ओळखण्या एवढे गोमंतकीय मुर्ख नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बिगर भाजपा मतांची विभागणी होऊ देणार नाही, असा निर्धारही करण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
अशा बेगडीपणाला यापुढे गोमंतकीय मतदार भूलणार नाहीत. भाजपविरोधी सर्व शक्ती एकत्र येतील व सरकारच्या पाडावासाठी मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण सांभाळण्याची ही शेवटची संधी असून प्रत्येक मतदार तिचा फायदा उठवतील, असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त केला.
उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र सध्या आम्ही काही मतदारसंघात घरोघरी संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. काँग्रेसने चतुर्थीपूर्वी युतीचा निर्णय घ्यावा, अन्यथा त्यानंतर अन्य पर्यायांचा विचार करण्यास आम्ही मोकळे असणार. तेव्हाच खऱया अर्थाने राजकीय हालचाली सुरू होतील, असे सरदेसाई यांनी सांगितले.
यु-टर्नची परंपरा आजही कायम
राज्य सरकार एका बाजूने पर्यटकांना गोव्यात आमंत्रित करते तर दुसऱया बाजूने स्वतःच्या नागरिकांना चतुर्थीकाळात एकमेकांच्या घरी जाण्यापासून रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी करते, आणि लगेच यु-टर्न घेत ती मार्गदर्शक तत्वे रद्दही करते. असा बालीशपणा या सरकारच्या डोक्यात कोण घालते तेच समजत नाही, असी टीका सरदेसाई यांनी केली. अशा हरवलेल्या सरकारच्या हातात गोमंतकीयांचे भवितव्य सुरक्षित नाही हेच यातून स्पष्ट होते. त्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारे या सरकारवर विसंबून न राहता स्वतःची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.









