कोल्हापूर/प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा एकेरी उल्लेख करून घोर अवमान केला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संबंध शाहूप्रेमींचाच अवमान झाला होता. फडणवीस यांच्या त्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर उद्रेक होऊन निषेध झाला होता. त्यावेळी समरजितसिंह घाटगे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती होते की, त्यांनी निषेधाचा एक शब्दही बोलले नव्हते. स्वतःला जनक घराण्याचे वारस म्हणून घेणारे समरजितसिंह घाटगे त्यावेळी ‘मूग गिळून का गप्प बसले होते? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना ही विचारणा करण्यात आली आहे.
“तो तुमचा सरंजामशाही विकृतपणाच…”
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कागलच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो माता-भगिनींच्या हाताला काम मिळवून त्यांना रोजगार देण्यामध्ये नामदार मुश्रीफांचे योगदान मोठे आहे. साहेबांच्या घरी शेकडो महिला आपल्या भावाचं हक्काचं घर समजून हक्कानं आपल्या अडचणी, समस्या, गाऱ्हाणीघेऊन येत असतात. त्यांना दारात उभं करणं असं जे तुम्हाला वाटतंय, तो तुमचा सरंजामशाही विकृतपणाच आहे.
फडणवीसांपेक्षाही गंभीर वक्तव्य…
माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा अपमान केल्याबद्दल घाटगे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले होते, की फडणवीस यांनी माफी मागितली आहे, आता त्यावर कशाला बोलायचे. हा तर फडणवीस यांच्यापेक्षाही गंभीर पद्धतीने समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा केलेला अवमान होता.