निफ्टीमध्येही काहीशी घसरण : टायटनचे समभाग प्रभावीत
वृत्तसंस्था / मुंबई
मागील दहा दिवसांची तेजी भारतीय भांडवली बाजाराने काल बुधवारच्या सत्रात गमावली आहे. या अगोदर आंतरराष्ट्रीय व स्थानिक घडामोडींच्या परिणामामुळे शेअर बाजाराचा सकारात्मक प्रभाव राहिल्याचे पहावयास मिळाले होते. परंतु आता कोरोना लसीच्या चाचणीचा प्रारंभ, येऊ घातलेला अर्थसंकल्प आणि बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण यामुळे देशातील शेअर बाजारात चढउताराचे वातावरण निर्माण झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
सदरच्या परिणामाचा प्रभाव म्हणून सलग दुसऱया आणि आठवडय़ातील चौथ्या दिवशी शेअर बाजार माहिती तंत्रज्ञान, बँकिंग आणि ग्राहक क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री झाल्याने बीएसई सेन्सेक्स गुरुवारी दिवसअखेर 80 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. सेन्सेक्स 80.74 अंकांनी घसरुन निर्देशांक 48,093.32 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8.90 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 14,137.35 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये टायटनचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी घसरले होते. सोबत नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक, इन्फोसिस, आयटीसी आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडीपैकी डेमोक्रेटीककडून जॉर्जिया सीनेटमधील विजयानंतर सकाळच्या सत्रात जागतिक बाजारात सकारात्मक कल राहिला होता. याचदरम्यान ट्रेडिंगमध्ये एफएमसीजीमधील समभागातील नफा कमाई कायम राहिली आहे. याचाही परिणाम देशातील शेअर बाजारात राहिल्याचे अभ्यासकांनी नमूद केले आहे. अन्य प्रमुख शेअर बाजारांमध्ये आशियातील चीनचा शांघाय कम्पोजिट, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे लाभात राहिले.








