बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांची आज गोविंदबाग बारामती येथे बैठक झाली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाच्या विविध आघाड्यांवर चालू असलेल्या चळवळीची विस्तृत चर्चा झाली.
भूमिहिनांसह शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच कुटुंबांना बंद पाईपने हक्काचे पाणी देणारा समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यात राबविण्यासाठी बुधवार दि १० रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक आयोजित करण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या. यावेळी सांस्कृतिक क्षेत्रात धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचा चालू असलेल्या हस्तक्षेपाबद्दल त्यांनी काळजी व्यक्त करून श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकारात चालू असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करून आपणही याबाबत एक व्यापक बैठक आयोजित करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुनर्वसनच्या क्षेत्रात चालू असलेल्या चळवळीबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून चळवळीसोबतच्या शहादा नंदुरबार येथील १९७३ च्या काही जुन्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.
यावेळी अध्यक्ष डॉ भारत पाटणकर, कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, आनंदराव पाटील, मोहनराव यादव, चैतन्य दळवी, अंकुश शेडगे, डी के बोडके, संतोष गोटल, मनोहर विभूते, महेश शेलार, सचिन कदम,तानाजी बेबले, रामभाऊ शेडगे इत्यादी उपस्थित होते.








