प्रतिनिधी/सांगली
भूतकाळ अन् भविष्यकाळ जाणत असल्याची दर्पोक्ती करणाऱया समडोळी (ता. मिरज) येथील उमर सुलतान मुजावर बाबा (वय 45) सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहे. अंधश्र्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसांच्या मदतीने गुरुवारी या भोंदूबाबाचा भांडाफोड केला. फसवणुकीसह जादूटोणा कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण निवृत्ती कोकरे (वय 32, रा. कुपवाड) यांनी याबाबतची फिर्याद दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, की समडोळी (ता. मिरज) येथे उमर मुजावर बुवावाजी करतो. दर गुरूवार आणि रविवारी त्याचा समडोळी येथे दरबार भरतो. अशी निनावी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आली होती. या तक्राराची दखल घेत प्रा. प. रा. आर्डे, राहुल थोरात आणि प्रा. अमित ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आशा धनाले, त्रिशला शहा, धनश्री साळुंखे, डॉ. सविता अक्कोळे, प्रविण कोकरे, चंद्रकांत वंजाळे हे समस्या घेऊन बाबांच्या कडे गेले. कार्यकर्त्यांनी बाबाला नसलेल्या अडचणी सांगितल्या.
उद्योगात नुकसान होतंय, बायकोशी वारंवार खटके उडत आहेत, अशी व्यथा बाबासमोर मांडली. मुजावरने जवळच्या व्यक्तीनेच अन्नातून करणी केल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावर जबरी उपाय म्हणून दरबारात नऊ वाऱया करण्यास सांगितले. दरम्यान, यावर तात्पुरते उपाय म्हणून अंगारा आणि हळदी कुंकवाच्या पुडय़ा कार्यकर्त्यांना दिल्या. त्या कारखान्याच्या आणि घराच्या चारही कोपऱयावर ठेवण्यास सांगितले. पहिल्या भेटीत बाबाने पैशाची मागणी केली नाही. दरम्यान आज गुरूवार असल्याने बाबाने कार्यकर्त्यांना पुन्हा बोलाविले होते.
त्यानुसार अंनिस कार्यकर्ते आणि ग्रामीण पोलीस बाबाच्या दरबारात गेले. त्याने करणी काढण्यासाठी अंगाराच्या पुडय़ा दिल्या. याशिवाय 1 हजार 551 रूपये देणगीची मागणी केली. अंनिसचे कार्यकर्ते आणि ग्रामीण पोलिसांनी दरबारात स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये मुजावर बाबा अलगद अडकला. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी कर्मचाऱयांसह भर दरबारातून बाबास अलगद उचलला. त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्यावर फसवणुकीसह जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








