प्रतिनिधी / कोल्हापूर
करिअरकडे आणि एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच विकसित नसेल तर वाट चुकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची अभ्यास करताना आपल्या सभोवतालचं जग समजून घेऊनच याची तयारी केल्यास यश नक्की मिळेल असे मत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी व्यक्त केले. ते कोतोली येथील श्रीपतराव चौगले आर्टस् अँन्ड सायन्स कॉलेज माळवाडी-कोतोली महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लोकभारती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अविनाश विलास कोतोलीकर यांच्यावतीने महाविद्यालयास देण्यात आलेल्या ”स्पर्धा परिक्षा पुस्तके” प्रदान कार्यक्रमा दरम्यान बोलत होते.
ज्ञानगंगा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले यांच्या अध्येक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास कोतोलीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील, जिल्हा परिषद सदस्या कल्पना चौगले, संस्थेचे सचिव शिवाजी पाटील, प्राचार्या डॉ.वंदना पाटील, पोलीस पाटील मोरारजी सातपुते, तसेच महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी होण्याचे आपले ध्येय आहे की नाही, आपल्यामध्ये अधिकारी होण्यासाठीच्या क्षमता आहेत का, अधिकारी होऊन आपल्याला नेमके काय करायचे आहे या प्रश्नांवर गांभीर्याने विचार करूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचाकडे वळावे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सातत्याने अभ्यास केलास नक्की यश मिळतं त्या दृष्टीने विद्यार्थांनी प्रयत्न करण्याचे सहाय्यक आयुक्त श्री लोंढे यांनी यावेळी सांगितले.
पन्हाळ्याच्या पश्चिम परिसरात सामान्य कुटूंबातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेकडे वळत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे अभ्यास साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने या आज लोकभारती पक्षाच्यावतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत जावून सामान्य नागरिकांची सेवा करतील हा विश्वास जिल्हाध्यक्ष अविनाश कोतोलीकर यांनी यावेळी व्यक्त केला. यापुढेही ही कोतोलीकर सेवाभावी संस्थेच्यावतीने अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान प्रा.महादेव कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रा.श्री. नाईक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. यावेळी श्रीपतराव चौगले आर्टस् अँन्ड सायन्स महाविद्यालयाच्यावतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले.