गायडेन्स व्हॅल्यू दरातही 10 टक्के कपात
प्रतिनिधी / बेंगळूर
नोंदणी आणि मुद्रांक खात्याच्या अखत्यारितील सबरजिस्ट्रार (उपनोंदणी) कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. नोंदणी महापरीक्षक आणि मुद्रांक आयुक्तांनी शनिवारी यासंबंधीचा आदेश दिला आहे. त्यानुसार मार्चअखेरपर्यंत दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीपर्यंत सबरजिस्ट्रार कार्यालये सुरू राहणार आहेत. त्यामुळे मालमत्ता नोंदणीसाठी नागरिकांना अनुकूल होणार आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांच्या अनुकूलतेसाठी गायडेन्स व्हॅल्यू दरामध्ये 10 टक्के कपात केली आहे.
मार्च महिन्यातील प्रत्येक शनिवारी राज्यातील सर्व सबरजिस्ट्रार कार्यालये सुरू राहणार आहेत. राज्यातील विविध स्थावर मालमत्ता म्हणजेच शेतजमीन, बिगरशेतकी जमीन, बांधकामे, अपार्टमेंट/फ्लॅट व इतर मालमत्तांच्या नोंदणीसाठी जारी असलेल्या गायडेन्स व्हॅल्यू दरात 10 टक्क्यांनी कपात केली आहे.
आतापर्यंत सबरजिस्ट्रार कार्यालयांचे कामकाज सकाळी 10 ते सायंकाळी 5ः30 यावेळेत चालत होते. मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी या कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. जनतेची ही गैरसोय विचारात घेऊन राज्य सरकारने 15 फेब्रुवारी रोजी सबरजिस्ट्रार कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत वाढविली होती. आता शनिवारी मार्चअखेरपर्यंत कार्यालये सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.









