योगींचा समाजवादी पक्षावर निशाणा
भाजपने उत्तरप्रदेश निवडणुकीच्या 3 मार्च रोजी होणाऱया 6 व्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचाराला वेग दिला आहे. सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी 10 जिल्हय़ांमधील 57 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सर्वप्रथम आंबेडकरनगर येथे दोन जाहीरसभांना संबोधित केले आहे.
येथील सभेत बोलताना योगींनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. डॉ. राममनोहर लोहिया एका खऱया समाजवाद्याने मालमत्ता आणि संततीपासू दूर रहावे असे म्हटले होते. परंतु आता जे कथित समाजवादी आहेत, त्याचा नारा सबका साथ परंतु सैफई घराण्याचा विकास असा आहे. समाजवादी पक्षाने स्वतःच्या शासनकाळात केवळ अराजकता फैलावली असल्याचे योगी म्हणाले.
सप सरकारमध्ये काही विशेष मतदारसंघ किंवा जिल्हय़ांनाच वीज मिळत होती, परंतु आज पूर्ण राज्यात 24 तास वीज मिळत आहे. पूर्वी सप आणि बसपकडून गरीबांचा पैसा हडप केला जात होता. शासकीय धान्य हत्तीच्या पोटात जात होते, परंतु आता महिन्यात दोनवेळा मोफत धान्य मिळत आहे. दंगल घडवून प्रत्येक जिल्हय़ात लोकांना आणि व्यापाऱयांना लुटणारे लोक आता हनुमानाची गदा घेऊन फिरत असल्याचे म्हणत योगींनी अखिलेश यांना लक्ष्य केले आहे.









