ऑनलाईन टीम/तरुण भारत
अमेरिकेनं तालिबानमधून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबूल विमानतळावर ताबा मिळवला आणि संपूर्ण अफगाणिस्तानवर अंमल प्रस्थापित झाल्याचं जाहीर केलं. त्यांनतर अफगाणिस्तानातील नागरिकांनी देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात लोक अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशात गेले आहेत. तालिबान्यांच्या कृत्याची संपूर्ण जगालाच चिंता आणि भिती वाटू लागली असली, तरी आता अफगाणिस्तानमधलं नवीन सरकार जागतिक स्तरावर स्वीकृती मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. सध्याच्या तालिबान सरकारमधील अनेक व्यक्ती या जागतिक स्तरावर दहशतवादी म्हणून काळ्या यादीत आहेत. त्यामुळे या सरकारला जागतिक स्वीकृती मिळावी यासाठी अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांकडून अनेक अटी घातल्या जात आहेत. अफगाणिस्तानवर घालण्यात आलेले निर्बंध तातडीने हटवावेत, यासाठी तालिबानी प्रयत्न करताना दिसत आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तालिबानकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानींचं ‘इस्लामिक एमिरेट’ सर्वसमावेशक होण्यासाठी तयार आहे, असं तालिबानींचा वरीष्ठ नेता सुहेल शाहीन यानं म्हटलं आहे. सुहेल शाहीनला संयुक्त राष्ट्रांसाठी तालिबानचा राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. मात्र, असं करताना तालिबान निवडक होण्यासाठी तयार नाही, असंही त्यानं स्पष्ट केलं आहे. प्रामुख्याने तालिबानमधील महिला आणि अल्पसंख्यकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा जागतिक स्तरावर उपस्थित केला जात आहे.