वाल्मिकी-म्हेतर समाजातील सुपुत्राची यशोगाथा : तबलावादक सचिन कचोटे यांना तबलावादन विषयातील पीएचडी : बडोद्याच्या द महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातर्फे सन्मान : कोल्हापूरच्या संगीत परंपरेत मानाचा तुरा
संजीव खाडे/कोल्हापूर
महापालिकेच्या आरोग्य सेवेत आयुष्य देणाऱया एका सफाईकामगार दाम्पत्याच्या मुलाने तबला वादन विषयातील पीएचडी मिळविण्याचा बहुमान संपादन केला आहे. सचिन दिलीप कचोटे असे या तबला वादकाचे नाव आहे. असे अभूतपूर्व यश मिळविणारे कचोटे वाल्मिकी-म्हेतर समाजातील संपूर्ण देशातील पहिले तबलावादक ठरले आहेत. बडोद्याच्या द महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाने कचोटे यांना तबला विषयातील पीएचडी सन्मानपूर्वक प्रदान केली.
शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असणाऱया आणि शास्त्राrय संगीत असो वा शास्त्राrय गायन असो किंवा शास्त्राrय तबला वादन त्यापासून तर कोसो दूर असणारे कचोटे यांचे घर. वडील दिलीप आणि आई लता यांचे सारे आयुष्य महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळण्यात गेले. वडिल दिलीप हे मुलांच्या शिक्षणासाठी आग्रही तर आई लता यांना कथ्थक नृत्याची आवड. पण परिस्थितीमुळे दोघांनाही या गोष्टी त्यांना करता आल्या नाहीत. मात्र त्यांनी मुलांना घडविण्याचा निश्चय केला. मुलगा सचिन कचोटे यांनी आपल्या आई-वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात आकारास आणले.
शिवाजी पेठेतील 8 नंबर शाळेसमोरील चाळीत सचिन यांचे लहानपण गेले. वीस पंचवीस वर्षांपूर्वी त्यांना संगीताचा लळा लागला आणि त्यातून एक तबलावादक जन्माला आला. तबल्याचा ठेका सचिन यांचे जीवन संगीतमय बनवून गेला. तबलजी म्हणून नावारूपाने आलेल्या सचिन यांनी हौशी शास्त्राrय गायक म्हणूनही हौस जपली आहे. कोल्हापूरच्या संगीत विश्वास आश्वासक तबलावादकात सचिन यांचा समावेश होतो. स्वर्गीय पंडीत गोविंदराव माजगावकर, स्वर्गीय पंडीत अरविंद मुळगावकर (दोघे मुंबई), पंडीत अमोद दंडगे (कोल्हापूर) यांचे शिष्योत्तम असणऱया सचिन यांनी आजवर आपल्या तबलावादनाने कलारसिकांना आनंद दिला आहे. बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठाची पीएचडी संपादन करण्यापूर्वी सचिन यांनी मुंबईच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची `संगीताचार्य’ (डॉक्टरेट इन तबला) ही सर्वोच्च संगीत पदविका मिळविली आहे. तबला वादनात दोन पीएचडी मिळवणारेही ते वाल्मिकी-म्हेतर समाजातील पहिले तबलावादक आहेत. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बडोदा विद्यापीठातील पीएचडीचा विषय
सैद्धांतिक तथा क्रियात्मक स्तर पर तबले का रियाज ः एक अध्ययन हा विषय सचिन कचोटे यांनी पीएचडीसाठी निवडला होता. त्यांना द महाराजा सयाजीराव गायकवाड, बडोदा विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. अजय अष्टपुत्रे यांचे विशेष मार्गदर्शन तर गुरूवर्य पंडीत अमोद दंडगे यांचेही मार्गदर्शन लाभले.
आई, वडिलांमुळे संगीत क्षेत्रात भरारी घेऊ शकलो. त्यांनी प्रोत्साहन, पाठबळ दिले नसते तर हा संगीतविश्वाचा प्रवास घडला नसला. गुरूजनांमुळे तर या सप्तसूर, ताल, बोल आणि ठेका यांच्याशी नाते जुळले. सारे यश आई, वडील आणि गुरूजनांच्या चरणी अर्पण करतो. -डॉ. सचिन कचोटे, तबलावादक (संगीताचार्य)









