बाहुबली नेता अभय सिंह : मुख्तार अंसारीसोबत कनेक्शन
अयोध्येतील गोसाईगंज विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अभय सिंह यांना शुक्रवारी रात्री उशिरा गोळीबार आणि दगडफेकीच्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना पहाटे 4 वाजता घरातून ताब्यात घेतले. यादरम्यान अभय सिंह यांनी आता निवडणूक तुमच्या भरवशावर असे समर्थकांना उद्देशून म्हटले आहे. उत्तरप्रदेशातील बाहुबली म्हणून ओळखले जाणारे अभय सिंह यांचे मुख्तार अंसारी याच्याशीही कनेक्शन आहे. एवढेच नाही तर कृष्णानंद राय हत्येपासून सीएमओ हत्येप्रकरणातही अभय सिंह यांचे नाव समोर आले होते.

पूर्वांचलच्या बाहुबलींमध्ये अभय सिंह आणि धनंजय सिंह या दोन जणांच्या मैत्रीचे उदाहरण कधीकाळी दिले जात होते. अभय सिंह अयोध्येतील गोसाईगंज मतदारसंघातून पुन्हा एकदा समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. अभय सिंह यांच्या विरोधात अयोध्येतील बाहुबली इंद्र प्रताप तिवारी उर्फ खब्बू तिवारी यांच्या पत्नी आरती तिवारी मैदानात आहेत. तर अजित सिंह हत्येप्रकरणी आरोपी असलेले धनंजय सिंह देखील निवडणूक लढवत आहेत. धनंजय सिंह यांच्यावर या प्रकरणी 25 हजार रुपयांचे इनाम देखील घोषित झाले होते. परंतु त्यांना एसटीएफच्या चौकशीत दिलासा मिळाला आहे.
मुख्तार अंसारीशी जवळीक
अभय सिंहचे नाव मुख्तार अंसारीच्या सर्वात खासमगास लोकांच्या यादीत सामील आहे. अभय सिंहला मुख्तार अंसारीचा उजवा हात म्हटले जाते. लखनौ विद्यापीठाच्या विद्यार्थीदशेतील राजकारणापासून उत्तरप्रदेशच्या राजकारणात ‘माननी’ होणारे अभय सिंह आणि धनंजय सिंह हे कधीकाळी जीवलग मित्र होते आणि मुख्तार अंसारीच्या टोळीचे सदस्य होते. मुख्तार अंसारीसाठी दोघेही काम करायचे. पंतु काळासोबत धनंजय सिंहने गट बदलला. परंतु अभय सिंह हा मुख्तारसोबतच राहिला. अभय सिंह विरोधात 10 खटले सुरू आहेत.
हत्यांप्रकरणी आरोपी
अभय सिंहचे नाव सर्वप्रथम लखनौचे तुरुंग अधिकारी आर.के. तिवारी यांच्या हत्येत समोर आले होते. तुरुंगाधिकारी तिवारी यांच्यासोबत लखनौ तुरुंगात अभय सिंहचा वाद झाल होता. त्यानंतर राजभवनसमोर तिवारींची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी एफआयआरमध्ये अभय सिंह नाव सामील होते.
व्हायरल ऑडिओने खळबळ
भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येतही अभय सिंहचा हात होता असे मानले जाते. हत्येशी निगडित एक ऑडिओ व्हायरल झाली होती. यात कथितपणे एक आवाज अभय सिंह आणि दुसरा आवाज मुख्तार अंसारीचा होता असे बोलले जाते. यात भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येनंतर मुन्ना बजरंगीकून शेंडी कापण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.









