36 जागांवर निवडणूक लढवू शकतो रालोद
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेश निवडणुकीवरून समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांच्यातील आघाडीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सपसोबत आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे रालोद प्रमुख चौधरी जयंत सिंह यांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत जयंत यांनी सप अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबतच्या भेटीचे छायाचित्र ट्विट केले आहे.
छायाचित्र शेअर करत जयंत यांनी ‘बढते कदम’ असे लिहिले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर सप आणि रालोद यांच्यातील आघाडी जवळपास निश्चित मानण्यात येत आहे. दोन्ही पक्षांमधील आघाडीची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची अपेक्षा वर्तविली जातेय.
निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानले जात आहे. चलू महिन्यात दोन्ही पक्षांच्या आघाडीची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण जागावाटपावरून चर्चा रखडली होती.
आघाडीनंतर रालोद उत्तरप्रदेशातील 36 जागा लढविणार असल्याचे मानण्यात येत आहे. रालोदने आघाडी अंतर्गत 50 जागांची मागणी केली होती. तर समाजवादी पक्षाने यापूर्वी 28-30 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. अनेक मतदारसंघांवर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत होता. याचमुळे आघाडीची अधिकृत घोषणा करण्यास विलंब झाला आहे.









