अचूक बातमी “तरुण भारत”ची; शुक्रवार, 1 आक्टोंबर 2021, सकाळी 10.30
सातारा / प्रतिनिधी :
सप्टेंबर महिना सातारा जिल्ह्याला कोरोनामुक्तीच्या वाटचालीवर नेणारा ठरला. सप्टेंबरच्या 30 दिवसात एका बाजूला रूग्णवाढीचा आलेख कमी होत गेलाच दुसरीकडे कोरोनामुक्ती बाधितांच्या तुलनेत दीडपटीने वाढली. त्यामुळे या महिन्यात काहीसे आशादायक आणि समाधानकारक वातावरण तयार झाले. आता आक्टोंबर महिन्याची सुरूवात होत असून पहिल्याच दिवशी आलेल्या अहवालात 198 नवे रूग्ण वाढले आहेत. 7 हजार 718 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
कोरोनामुक्ती 4 हजाराने वाढली
सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात कोरोना रूग्णवाढ 579 ते 311 या दरम्यान होती. याच आठवड्यात कोरोनामुक्ती 763, 633 ते 1093 पर्यंंत गेली. सप्टेंबरचा दुसरा आठवडा रूग्णवाढीत कमालीची घसरण करणारा ठरला. या आठवड्यात 425 हा रूग्णवाढीचा सुरूवातीचा आकडा 202 पर्यंत घसरला. तर कोरोनामुक्ती दुप्पटीने वाढली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रूग्णवाढ अपवाद वगळता 150 च्या आसपास राहिली तर कोरोनामुक्ती 445 ते 137 या दरम्यान झाली. एकून 30 दिवसांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात 8 हजार 906 रूग्णांची वाढ झाली तर 12 हजार 256 रूग्णांनी कोरोनावर मात केली.
आक्टोंबरमधे सावधगिरी गरजेची
सप्टेंबर महिन्यात रूग्णवाढीचा आलेख घसरला हे सुःखद आहे. आता आक्टोंबर महिना सुरू होत असून, आक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 तारखेला शाळा सुरू होत आहेत. 7 तारखेला मंदीरे खुली होत आहेत. त्यामुळे शासनाने नियमावली तयार केली आहे. सध्या सुरू असलेली कोरोनाची स्थिती आणखी आटोक्यात येऊन जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी नियमांचे पालन गरजेचे आहे. याच महिन्यात नवरात्र तर पुढील महिन्यात दिवाळी सण उत्साह वाढवणारा असेल. त्यासाठी आत्तापासून प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवल्यास सप्टेंबर महिन्यापेक्षा आक्टोंबर महिना सुःखद ठरेल.
गुरूवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 198
एकूण मुक्त 137
एकूण बळी 00
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 2078545
एकूण बाधित 248563
घरी सोडलेले 239304
मृत्यू 6084
उपचारार्थ रूग्ण 5661









