काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची मागणी : कोरोनाच्या तिसऱया लाटेबाबत पत्रक प्रसिद्ध
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात 80 टक्के लसीकरण पूर्ण करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केली. कोरोनाच्या तिसऱया लाटेबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
3 महिन्यात राज्यातील 80 टक्के वृद्धांना दोन्ही डोस दिल्यास कोरोनाच्या तिसऱया लाटेपासून त्यांचे संरक्षण होऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाच्या तिसऱया लाटेची तीव्रता वाढणार असल्याचे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे 80 टक्के तरी वृद्धांना दोन्ही डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळेच तिसऱया लाटेची तीव्रता रोखणे शक्य होईल. राज्य सरकार या आव्हानासाठी सज्ज आहे का?, असा प्रश्न शिवकुमार यांनी उपस्थित केला आहे.
केवळ 1 डोस दिल्यास कोरोनावर नियंत्रण होणे शक्य नाही. कोरोनापासून पूर्ण संरक्षणासाठी दोन्ही डोस देणे गरजेचे आहे, असे अध्ययनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सप्टेबर अखेरपर्यंत 80 टक्के वृद्धांचे लसीकरण करण्याचे पाऊल सरकारने उचलावे. हे आव्हान अशक्य नाही. परदेशात लसी न पाठवता आपल्या लोकांना लस देण्यावर भर द्या. लसीकरणाबाबत भाजप नेत्यांकडून होत असलेले राजकारण थांबवून सर्वांचे लसीकरण करत नागरिकांचे संरक्षण करण्याचे कार्य करावे, असेही डी. के. शिवकुमार त्यांनी सांगितले.









