टोल संकलन 1,941 कोटी रुपयांच्या घरात : उत्सवी काळात वाहनांच्या वर्दळीत वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील काही दिवसांपासून देशात अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात आल्यानंतर इंधन विक्रीसोबत विविध व्यापार-उद्योग क्षेत्रात सुधारणा होत गेल्याचे चित्र पहावयास मिळालेले आहे. यामध्ये सध्या देशातील महामार्गावर पुन्हा एकदा व्यावसायिक वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात वेग पकडत असल्याचे दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात टोल संकलनाचा आकडा कोविड पूर्वच्या स्थितीत आल्याची माहिती रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालातून देण्यात आली आहे.
देशभरातील हायवेवर इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाची आकडेवारी रेटिंग एजन्सी क्रिसिल या रिसर्च फर्मने जमवली आहे. यामध्ये सप्टेंबरमध्ये हायवेवर एकूण 11 कोटी वाहनांची ये-जा झाली आहे. यातून टोल संकलनाचा आकडा हा 1,941 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची माहिती आहे.
अनलॉकची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रथमच हायवेवर मोठय़ा प्रमाणात वाहनांच्या वर्दळीने वेग पकडल्याचे दिसून आले. उत्सवी काळात अनेकांनी प्रवास केल्याचे यावरून दिसून आले.
संकलनात तेजी
चालू वर्षातील सदरचे टोल संकलन हे उच्चांकी पातळीवर राहिल्याची माहिती क्रिसिल रिसर्चच्या संचालक ईशा चौधरी यांनी दिली आहे. कारण या अगोदर फेब्रुवारी 2020 मध्ये हायवेवर एकूण 10 कोटी वाहनांची ये-जा झाली होती.
लॉकडाऊनचा प्रभाव
मार्चमध्ये वाहनांच्या वर्दळीत घसरण होत वाहनांची संख्या 8.5 कोटींवर आली होती. यानंतर एप्रिलमध्ये 1 कोटी, मे 5.5 कोटी अशी राहिली होती. राज्यांच्या व जिल्हय़ांच्या सीमा बंद राहिल्याने हा परिणाम मोठय़ा प्रमाणात राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.









