निर्यात क्षेत्रात सुधारणांचे संकेत : लॉकडाऊनमुळे उत्पादन क्षेत्र प्रभावीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या कारणामुळे सलगच्या येत असणाऱया नकारात्मक बातम्यांमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक असल्याचे पहावयास मिळत होते. परंतु सप्टेंबर महिन्यात मात्र उत्पादन क्षेत्राने समाधानकारक कामगिरी केली असल्याचे पहावयास मिळाले असून यामध्ये पर्चेजिंग मॅनेजर्स निर्देशांक (पीएमआय) 58.8 वर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये हा 52 वर होता. जानेवारी 2012 रोजी हा पीएमआय सर्वात उच्चांकी पातळीवर राहिला होता.
आयएचएस मार्केटचे सहाय्यक संचालक पोली अन्ना डे लीमा यांनी सांगितले आहे की, उत्पादन क्षेत्रातील हालचाली योग्य दिशेने वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सरकारकडून 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यामुळे आर्थिक आणि अन्य व्यवसायाशी संबंधीत व्यवहार प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. याच कारणामुळे एप्रिलमध्ये पीएमआय निर्देशांक घसरला होता. तसेच सलग 32 महिन्यापर्यंत वाढीनंतर ही घसरण नोंदवली होती.
लीमा यांनी म्हटल्याप्रमाणे सलग सहा महिने निर्यातीत घसरण झाल्यानंतर आता नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. यामध्ये सध्या निर्यात क्षेत्रात सुधारणा होत आहेत. सप्टेंबरमध्ये पीएमआय डाटामधून खरेदीचा दर वाढला असल्याने व्यावसायिकांचा विश्वास मजबूत होत असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. विविध माध्यमातून सामाजिक अंतरासह अन्य सूचनांचे पालन करुन उत्पादनात कामगिरी पार पाडली जात आहे.
तयार साहित्याच्या किमती वाढल्या
पीएमआय सर्वेच्या आधारे जवळपास मागील सहा महिन्यात प्रथमच तयार साहित्यांच्या किमती वाढलेल्या आहेत. एक तृतीयांश उत्पादन क्षेत्रात आगामी 12 महिन्यांपर्यंत वाढ होण्याचे संकेत आहेत.









