ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील समाजवादी पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार आणि अत्तर व्यापारी पुष्पराज जैन उर्फ पम्पी यांच्या निवासस्थान आणि कार्यालयासह 50 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाच्या पथकांनी केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही छापे टाकले आहेत. करचुकवेगिरीप्रकरणी सकाळी 8 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे.
अत्तर व्यापारी पीयूष जैनच्या मुसक्या आवळल्यानंतर चौकशीदरम्यान पम्पी जैन यांचे नाव पुढे आले. पम्पी जैन यांचा अत्तर, पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय आहे. दोघांचे आडनाव जैन असून, ते एकाच भागात राहतात. त्यांचा अत्तराचा व्यवसायही सारखाच आहे. मात्र, पीयूष जैन याच्याशी माझा कोणताही संबंध नसल्याचे पम्पी जैन यांनी सांगितले होते. मात्र, करचुकवेगिरीच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले आहेत. पम्पी यांच्याशिवाय आयकर विभागाच्या पथकाने कन्नौजचा आणखी एक अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब यांच्या ठिकाणांवरही छापा टाकला आहे.
तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने पम्पी यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात सरकारवर हल्ला चढवला आहे. सपा अध्यक्ष याच प्रकरणावर आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार होते. मात्र, आता शोधमोहिमेनंतर काय होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी कन्नौज येथे पत्रकार परिषद जाहीर करताच भाजप सरकारने पम्पी जैन यांच्यावर छापा टाकण्यास सुरुवात केली. भाजपची भीती आणि गोंधळ स्पष्ट आहे, जनता भाजपाला धडा शिकवण्यास तयार आहे, असे सपाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.