लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱया सरकारला धडा शिकविणार
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशच्या दौऱयावर असणाऱया काँग्रेस नेत्या प्रियंका वड्रा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. महिला सरपंच, आमदार, खासदार, पंतप्रधान होतील आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱयांना आश्रय देणाऱया सरकारला पराभूत करतील हे लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱया भाजपच्या गुंडांनी जाणून घ्यावे असे प्रियंका यांनी म्हटले आहे.
पंचायत निवडणुकीत भाजपकडून झालेल्या हिंसेची शिकार ठरणाऱया सर्व बहिणी, नागरिकांच्या न्यायासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लखीमपूर खीरीमध्ये सप कार्यकर्त्या अनिता यादव यांची प्रियंका यांनी भेट घेतली आहे. अनिता यांच्यासोबत निवडणुकीवेळी गैरवर्तन झाले होते.
अर्ज भरताना अनिता यांना घेरून बडविण्यात आले होते. त्यांची साडी घेचण्यात आली होती. अनिता यांच्यासोबत लहान मुलगा होता, कुटुंबीयांसोबतही अशाप्रकारचा अत्याचार झाला त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप प्रियंका यांनी केला आहे.
पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत आहे. पंचायत निवडणुकीत उत्तरप्रदेशातील प्रत्येक राज्यात काही ना काही घडले आहे. काही ठिकाणी हिंसा झाली, तर काही ठिकाणी बॉम्ब फुटले आहेत. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला आहे. या गुन्हय़ांमागे असलेल्या लोकांच्या विरोधात कारवाई व्हावी असे प्रियंका यांनी म्हटले आहे.









