फसवणुकीप्रकरणी अटक होणार नाही
तिरुअनंतपुरम
केरळ उच्च न्यायालयाने अभिनेत्री सनी लियोनीला अटकेच्या कारवाईपासून दिलासा दिला आहे. हे प्रकरण 29 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहे. सनी यांच्याकडून दाखल अंतरिम जामीन याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. तिच्या विरोधात एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तक्रार केली होती. 2019 मध्ये पैसे स्वीकारूनही व्हॅलेंटाईन दिनी कार्यक्रमासाठी अभिनेत्री उपस्थित न राहिल्याचे कंपनीने म्हटले होते. सनी लियोनीला कोचीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 3 फेब्रुवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे चौकशीसाठी बोलाविले होते. तिच्या विरोधात भादंविचे कलम 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. दोनवेळा जाऊनही कार्यक्रम झाला नव्हता. तसेच हा कार्यक्रम अनेकदा रद्द करण्यात आला होता, असा दावा सनीकडून करण्यात आला होता. कोचीनजीकच्या अंगमालीमध्ये एडलक्स इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. पण आयोजकांकडून 12 लाख रुपयांचे येणे असल्याचा युक्तिवाद अभिनेत्रीच्या वतीने करण्यात आला आहे. तपास अधिकाऱयांना पूर्ण सहकार्य केले आहे. तसेच स्वतःसोबत घडलेल्या घटनेची माहितीही दिली आहे. तसेच तक्रारदारासोबत झालेल्या देवाणघेवाणीचे दस्तेएवजही उपलब्ध केल्याचे तिने म्हटले आहे. तर तक्रारदार शियाजने भरपाईदाखल दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे.









