वृत्तसंस्था / दुबई
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सची आयपीएलमधील साखळी लढत मंगळवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. धोनीच्या संघाचे आतापर्यंत निष्प्रभ प्रदर्शन झाले असल्याने यापुढील सर्वच सामन्यात त्यांनी सुधारित प्रदर्शन केले तरच त्यांना प्लेऑफची आशा करता येणार आहे. सायंकाळी 7.30 पासून सामन्याला प्रारंभ होईल.
तीन वेळचे चॅम्पियन्स आणि मागील आवृत्तीचे उपविजेते असलेले सीएसके नशीब बदलण्याची अपेक्षा करीत आहे. कारण त्यांनी सातपैकी पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आठ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा निम्मा टप्पा संपत आला असून सध्या चेन्नई संघ शेवटून दुसऱया स्थानावर आहे. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित सामन्यांत चांगले प्रदर्शन करणे क्रमप्राप्त आहे. आयपीएलच्या इतिहासातील धावांचा पाठलाग करणारा सर्वात यशस्वी संघ, असा त्यांनी लौकीक मिळविला असून धोनीला तर चेसमास्टर म्हटले जाते. पण यावर्षी त्यांची फलंदाजी खूपच ढेपाळली असल्याने धावांचा पाठलाग करावे लागलेल्या सामन्यातच त्यांचे अधिक पराभव झाले आहेत.
शेन वॅसटन व फॅफ डय़ु प्लेसिस यांनी आतापर्यंत बऱयापैकी कामगिरी केली आहे. मात्र त्यांच्या मध्यफळीला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. केदार जाधवला वारंवार संधी देण्याच्या निर्णयावर बरीच टीका झाल्यानंतर मागील सामन्यात त्याला वगळण्यात आले आणि त्याच्या जागेवर आलेल्या जगदीशनने (28 चेंडूत 33 धावा) अम्बाती रायुडूसमवेत चांगले प्रदर्शन केले. मात्र ही जोडी फुटल्यानंतर चेन्नईच्या पाठलागातील हवाच निघून गेली. सॅम करण, जडेजा, ड्वेन ब्रॅव्हो हे देखील संघाला अडचणीतून बाहेर काढण्यात अपयशी ठरले होते. स्वतः धोनीला देखील धावांचा पाठलाग करताना वेग वाढण्यात अपयश आले असून आपल्या संघाच्या फलंदाजीतील त्रुटीही त्याने मान्य केल्या आहेत. ‘नीरस फलंदाजी ही आमची प्रमुख चिंता बनली असून त्यावर त्वरित उपाय करणे गरजेचे आहे. आम्हाला आता दुसऱया पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करताना बळी गेले तरी हरकत नाही. पण 15-16 षटकानंतर मोठे उद्दिष्ट बाकी ठेवणे योग्य ठरणार नाही,’ असे धोनी म्हणाला.
गोलंदाजीत दीपक चहर व जडेजा यांनी प्रभावी कामगिरी केली तर ब्रॅव्होचे पुनरागमन दिलासा देणारे होते. मात्र करण, शार्दुल ठाकुर, कर्ण शर्मा यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे.
याच दोन संघांत झालेल्या याआधीच्या सामन्यात चेन्नईला 7 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची परतफेड करण्याची संधीही धोनी आणि कंपनीला मिळाली आहे.
सनरायजर्स संघाची कामगिरी चेन्नईपेक्षा बरी झाली असून ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यांनी सात सामन्यात 3 विजय मिळविले आहेत. मात्र रविवारी राजस्थानकडून पाच गडय़ांनी झालेला पराभव त्यांना खूपच झोंबला आहे. त्यांनी 4 बाद 158 धावा जमवित नंतर सामन्यावर एकवेळ पूर्ण नियंत्रण मिळविले होते. पण अखेर त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यांची फलंदाजी भक्कम असल्याने त्या विभागात त्यांना चिंता वाटत नाही. बेअरस्टो, कर्णधार वॉर्नर, मनीष पांडे, केन विल्यम्सन यांनी बऱयापैकी सातत्य दाखवत धावा जमविल्या असून एकटय़ाने जबाबदारी पेलण्याची त्यांच्यात कुवत आहे. मात्र गोलंदाजी हा त्यांचा कच्चा दुवा बनला आहे. रविवारी गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळेच सनरायजर्सला पराभवाला सामोरे जावे लागले होते. भुवनेश्वर व मार्श दुखापतीमुळे बाहेर पडले असतानाही रशिद खान, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजन यांनी चांगली झुंज देत आव्हान जिवंत ठेवले होते. पण राजस्थानला 5 बाद 78 असे अडचणीत आणलेले असतानाही सनरायजर्सच्या मधली षटके टाकणाऱया गोलंदाजांनी नीरस कामगिरी केल्यामुळे राजस्थानने त्याचा फायदा उठविला. संदीप शर्मा, खलील अहमद, अभिषेक शर्मा हे त्यांचे गोलंदाजीतील कच्चे दुवे असून त्यावर त्यांना लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे.
सनराजयर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, पांडे, गोस्वामी, विराट सिंग, गर्ग, साहा, समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, ऍलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाझ नदीम, कौल, स्टॅन्लेक, नटराजन, थाम्पी.
सीएसके : धोनी (कर्णधार), विजय, रायुडू, डय़ु प्लेसिस, वॅटसन, जाधव, ब्रॅव्हो, जडेजा, एन्गिडी, दीपक चहर, चावला, ताहिर, सँटनर, हॅझलवुड, ठाकुर, सॅम करण, जगदीशन, केएम असिफ, मोनू कुमार, साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.









