मार्शऐवजी जेसॉन होल्डरचा संघात समावेश
वृत्तसंस्था / दुबई
ऑस्ट्रेलियन व सनरायजर्स हैदराबादचा अष्टपैलू मिशेल मार्श बुधवारी उर्वरित आयपीएल स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. आरसीबीविरुद्ध साखळी सामन्यात पायाची दुखापत झाल्यानंतर तो उर्वरित सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. विंडीज कर्णधार जेसॉन होल्डर आता हैदराबाद संघात मिशेल मार्शची जागा घेईल.
‘मिशेल मार्श दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर फेकला गेला आहे. तो दुखापतीतून लवकर सावरेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जेसॉन होल्डर लवकरच संघात दाखल होईल’, असे ट्वीट सनरायजर्स हैदराबाद संघाने करत ही माहिती दिली. यापूर्वी सोमवारी आरसीबीविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात मार्श पाचव्या षटकात गोलंदाजीला आला. पण, तो केवळ चारच चेंडू टाकू शकला. ऍरॉन फिंचने ड्राईव्ह मारल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात असताना मार्शचा पाय दुखावला. त्यानंतर त्याने आणखी दोन चेंडू टाकले. त्यानंतर त्याला मैदान सोडावे
लागले. दुखापत झालेली असताना फलंदाजीत तो दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याचे धाडस केले. पण, क्रीझवर उभे राहणे देखील त्याच्यासाठी कष्टप्रद ठरत होते. मार्श आयपीएल स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर फेकला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. 2017 मध्ये त्याला खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले होते.
मिशेल मार्शऐवजी सनरायजर्स हैदराबाद संघात स्थान लाभलेला जेसॉन होल्डर हा यापूर्वी 2014-15 हंगामातही याच संघाकडून खेळला. त्याने आयपीएलमध्ये शेवटचे प्रतिनिधीत्व 2016 साली केले होते. त्यावेळी तो केकेआर संघात होता. अलीकडेच कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही त्याने सहभाग घेतला होता.









