‘अनन्या’ फेम अभिनेत्री ऋतुजा बागवेचे मत : सेलिब्रेटींकडून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन! : आम जनतेनेही शिस्त पाळल्यास कोरोनाशी सामना शक्य
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
कोरोनाच्या संकटाचा सामना करायचा असेल, तर सद्यस्थितीत फक्त घरी थांबा. कामाशिवाय बाहेर फिरणे म्हणजे देशाशी केलेली एकप्रकारे गद्दारीच आहे. आज देशाला गरज असताना जो घरात थांबत नाही, तो माझ्या मते देशद्रोही समजावा. कोरोनारुपी राक्षसाचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व सेलिब्रेटी आज घरात थांबलो आहोत. मग तुम्हीही आम्हाला फॉलो करत घरातच थांबा ना. का उगीच जीवाशी खेळता. एकच विनंती आहे, की ज्या कोरोनाने संपूर्ण जगाला थांबविले आहे. तिथे आपण घरात थांबायला काय हरकत आहे आणि यातच आपले सर्वांचे व राष्ट्राचे भले आहे, असे मत सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘अनन्या’ या नाटकातील शीर्षक भूमिका साकारणाऱया आणि ‘नांदा सौख्य भरे,’ ‘तू माझा सांगाती’मधील व मूळ मसुरे देऊळवाडा गावची कन्या ऋतुजा राजन बागवे या अभिनेत्रीने ‘तरुण भारत’शी मुंबई येथून दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केले.
तसे पाहता, ऋतुजा ही नांदा सौख्यभरे आणि तू माझा सांगाती या मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचली, तर अनन्या या नाटकातून नाटय़ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एरव्ही आपल्या संपूर्ण बिझी शेडय़ुलमध्ये ऋतुजाला वेळ मिळणे कठीण असते. पण कोरोनामुळे आज पूर्ण फिल्म इंडस्ट्री इतिहासात प्रथमच थांबली आहे. ऋतुजा सांगते, आज जो संपूर्ण दिवस-रात्र मोकळा वेळ मिळाला आहे, यात मी रोज घरी स्वयंपाक करणे, नवीन डिश शिकण्याचा प्रयत्न करणे, टीव्हीवरील जुन्या मालिका पाहणे, व्यायाम, योगा करणे, मित्र-मैत्रिणींना फोन, व्हिडिओ कॉल करणे व चित्रकलेची माझी आवड जपण्याचा प्रयत्न करते. रात्री विविध पुस्तके वाचून वाचनाची आवडही जोपासते. मोबाईलवर गेम खेळणे त्यात ल्युडो हा खेळ माझा आवडता आहे. फावल्या वेळेत गायनाची आवडही जपते. या सर्वांतून माझ्या कुटुंबाला मी पूर्णवेळ देते. मागील काही काळ माझ्या चित्रपट, मालिकांतील बिझी शेडय़ुलमुळे घरी वेळ देता येत नव्हता. कधी मनात आले, तर पत्ते खेळणे किंवा इतर खेळ खेळते पण योगा आणि व्यायाम मात्र नित्यनेमाने करते.
लॉकडाऊन न पाळल्याने धोका वाढतो!
मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाने जनजीवन विस्कळीत करून सोडले आहे. रोज टीव्हीवरील बातम्यांमधून कोरोना रुग्णांची माहिती मिळते. पण आज जे या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, ते पाहून भीती वाटते. आपण सर्वांनी शासनाचे नियम पाळले, तर निश्चितच कोरोनाचा सामना आपण योग्यप्रकारे करू शकतो पण आज मुंबई मात्र थांबताना दिसत नाही. शासनाने संचारबंदी करून आता जवळजवळ एक महिना होत आला आहे. पण काही लोक शासनाचे आदेश पाळत नाहीत आणि रस्त्यावर येतात, हाच खरा धोका आहे. आज लॉकडाऊन असले, तरी मुंबईमध्ये लोक मात्र बाहेर येत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि यासाठी शासनाने कठोर पावले उचलली पाहिजेत. आज भाजी किंवा किराणा वस्तू अथवा औषधाच्या नावाखाली लोक रस्त्यावर येत आहेत आणि हे थांबले पाहिजे.
पोलीस, आरोग्य यंत्रणा आदींना सलाम
मुंबईमध्ये आज घरातून बाहेर न पडता जे हवे असेल, ते मिळते परंतु काही तुरळक लोक या घराबाहेर पडतात. पोलीस प्रशासन, राज्य शासन आपली भूमिका योग्यप्रकारे बजावत आहे. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. इथे काही भागांमध्ये मात्र जेव्हा एखादा कोरोनासदृश रुग्ण मिळतो, तेव्हा आजूबाजूचे सर्व मार्ग प्रशासन सील करते. यावेळी मात्र मोठय़ा कष्टाचा सामना करावा लागतो. 12 तास तर कधी-कधी काहीच मिळत नाही आणि अशावेळी जीव मुठीत घेऊन राहवे लागते. त्यावेळी कधी काय होईल, याचा नेम नसतो. याच दरम्यान या भागात आपले प्रशासन जी खबरदारी घेते, ती मात्र कौतुकाची आहे. सर्व डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस बांधव आपल्या जीवाची बाजी लावून लढत आहेत. कोरोनाचा सामना मुंबईकर करताना पाहून त्यांच्या कार्याला आणि कामाला सलाम करावा लागेल, असे ऋतुजा बागवे सांगताना थोडी भावूक होते.
लॉकडाऊन उठल्यावरही नाटकांना फटका बसणार
ऋतुजा सांगते, माझ्या संपूर्ण करिअरमध्ये हे असे लॉकडाऊन प्रथमच घडत आहे. याचा फटका सिने आणि नाटय़सृष्टीला बसणार आहे हे निश्चितच. भले लॉकडाऊन जेव्हा उठेल आणि जनजीवन सुरू होईल पण सिनेमा आणि नाटय़गृहांकडे मात्र पहिले दोन महिने तरी प्रेक्षक पाठ फिरवतील. कारण कोरोनाची भीती असणार आहे. ही सर्व थिएटर परत-परत निर्जंतुकीकरण करून होत नाही, तोपर्यंत भीतीमुळे रसिक थिएटरकडे वळणार नाही हे नक्की. यामुळे कोरोनाचा फटका बसणार तो सिने आणि नाटय़सृष्टीला. मालिका मात्र अगदी नेहमीच्या ताकदीने सुरू राहतील आणि रसिकही लाभतील, असे मनोमनी वाटते. जर ही संचारबंदी समजा 3 मेनंतरही पुन्हा वाढली, तर मात्र सिने, नाटय़सृष्टीवर ज्यांचे संसार उभे आहेत, त्यांना मात्र मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. कारण यात अनेक कामे ही हाताला काम असले, तर रोजगार मिळविणाऱयांची आहेत, असे ती सांगते.
‘यह वक्त भी गुजर जाएगा!’
लॉकडाऊनमुळे अनन्या नाटकाचा 300 वा प्रयोग मुंबई येथे 22 मार्चला होणार होता पण तो रद्द झाला. कोरोनामुळे अनेक नाटय़ कलाकार तसेच नाटय़क्षेत्रातील सर्व एकमेकांवर अवलंबून असणारे सर्वजण चिंतेत आहेत पण मला असे वाटते, की ‘यह वक्त भी गुजर जाएगा’ आपण सर्वजण कोरोनावर मात करू. हे काढलेले दिवस विसरू नका. जास्तीत जास्त वेळ कुटुंबासाठी द्या. शासनाच्या सूचनांचे पालन करा. घरी राहा, सुरक्षित राहा. लवकरच नाटक आणि मालिकांमधून रसिकांच्या भेटीला येईल, असे ऋतुजाने सांगितले.









