वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड-19 मुळे आताच्या घडीला जे कोटय़वधी लोक धोक्यात आहेत, त्यांच्यावरील धोका टाळला जाईतोवर आयपीएल निश्चितच प्रतीक्षा करु शकते, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचा अनुभवी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने केले. 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये घरीच थांबणे का महत्त्वाचे आहे, याबाबत रैनाने जनजागर सुरु केला असून त्या पार्श्वभूमीवर त्याने वृत्तसंस्थेशी संवाद साधला.
कोव्हिड-19 विरुद्धच्या लढय़ासाठी स्वतः रैनाने यापूर्वी 52 लाख रुपये प्रदान केले आहेत. सध्या आयपीएल 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकले गेले आहे. त्यानंतरही ते होण्याची शक्यता अतिशय अंधूक आहे. रैनाने मात्र आयपीएलपेक्षा आयुष्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित केले आहे.
आताच्या घडीला आपले घर किती मोठे आहे, आपल्याकडे किती महागडी कार आहे किंवा आपल्याकडे किती उच्च दर्जाचे कपडे आहेत, यापेक्षा दिवसातून तीनवेळा आहार मिळणे महत्त्वाचे झाले आहे. केंद्र सरकारने जे दिशानिर्देश दिले आहेत, त्यांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. जेव्हा जनजीवन पूर्वपदावर येईल, सारे काही सुरळीत सुरु होईल, त्यावेळी आयपीएलबाबत विचार करता येईल. वर्तमानात अनेक लोक कोरोनामुळे धोक्याच्या टप्प्यात आहेत. त्यांचे जीव सर्वप्रथम वाचवायला हवेत’, असे रैना म्हणाला. मागील आठवडय़ात रिओ पुत्ररत्न लाभल्यानंतर आपण उत्तम होममेकर होण्याचा प्रयत्न करत आहे, असे 33 वर्षीय रैनाने आवर्जून सांगितले.
‘पूर्वी कधीही नव्हती, तितकी आता आयुष्याची किंमत समजू लागली आहे’, असे त्याने येथे गांभीर्याने नमूद केले. आपल्या सध्याच्या दैनंदिनीचा उल्लेख करताना तो म्हणाला, ‘लॉकडाऊनच्या कालावधीत मी बराच आराम करत आहे. स्वयंपाकात काही प्रयोग करत आहे. शिवाय, मुलांसमवेत वेळ व्यतित करतो आहे. क्रिकेटपलीकडेही आयुष्य असते, त्याचा यावेळी प्रत्यय येतो आहे. या लॉकडाऊनच्या निमित्ताने आपले पाय नेहमी जमिनीवरच का असावेत, हे दिसून येते’.
रैनाने गतवर्षी आयपीएल फायनल खेळली, ही त्याची शेवटची व्यावसायिक लढत ठरली असून यंदाच्या हंगामात खेळण्यासाठी त्याची जोमाने तयारी सुरु होती. चेन्नईत आयोजित शिबिरात धोनी देखील रैनासह सहभागी झाला होता. पण, त्याचवेळी राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि शिबिर स्थगित करण्यात आले. कोरोनाच्या प्रकोपामुळे सारे काही अनिश्चित झाले आहे.









