हेस्कॉमचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
सदाशिवनगर येथील दुसरा मुख्य क्रॉस, पाचवा क्रॉस येथे सोमवारी सकाळी विद्युतवाहिन्यांनी पेट घेतला. वाहिन्यांमध्ये ठिणगी पडून आग पेटत होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. या ठिकाणी वारंवार आग पेटत असून तक्रार करूनदेखील हेस्कॉमकडून योग्य दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी सकाळपासून पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील बऱयाचशा भागात शार्टसर्किट, ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या पडणे, आवाज येणे असे प्रकार घडत होते. काही ठिकाणी कंडक्टर जळाले आहेत. त्यातच वीज कोसळत असल्यामुळे हेस्कॉमच्या साहित्याचे नुकसान झाले.
सदाशिवनगर येथे वारंवार विद्युतवाहिन्यांना आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. आग भडकून मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. अनेकवेळा तक्रार करून तात्पुरती दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे हेस्कॉमने कायमस्वरुपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









