आमदार बेनके यांचा पाहणीदौरा : नागरिकांना भेडसावणाऱया समस्या निवारणाची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या विकासासाठी शंभर कोटी अनुदानामधून निधी खर्ची घालण्यात आला आहे. मात्र सदाशिवनगर परिसरातील समस्या पाहता शंभर कोटींचा विनियोग कुठे केला आहे? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. सदाशिवनगर परिसरातील समस्यांचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके यांनी पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस परिसराच्या विकासाकडे 10 वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले असून रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. परिणामी रहिवाशांना डासांच्या उपद्रवाचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत असून रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. पावसाळय़ात घरात पाणी शिरते. कित्येकवेळा महानगरपालिकेकडे निवेदन देऊनदेखील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत निधी मंजूर असूनही विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. नवीन गटारी बांधकाम करण्याच्या मागणीसह विविध तक्रारी नागरिकांनी आमदारांकडे केल्या. काही नाल्यांमधील कचऱयाची उचल केली जात नाही. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही याची दखल घेतली जात नाही. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा आणि भेडसावणाऱया समस्यांचा विचार करून निवारण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले, अनिल चव्हाण, अभिषेक मठपती, शिवाजी शिंदे, सागर शिंदे, शरनु गंधिगुडी, सुरेश हलवाई व इतर रहिवासी उपस्थित होते.









