गटारींचे बांधकाम त्वरित न केल्यास एपीएमसी रोडवर रास्तारोको करण्याचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
सदाशिवनगर पहिला मुख्य क्रॉस क्रमांक 2 व 3 येथील गटारींची स्थिती दैयनीय झाली आहे. गटारी जुन्या असल्याने कोसळून सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. गटारींच्या बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. गटारींचे बांधकाम त्वरित न केल्यास एपीएमसी रोडवर रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
शहरातील विविध उपनगरांतील गटारींचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र सदाशिवनगरमधील या गटारींच्या बांधकामाकडे दुर्लक्ष झाले आहे. कित्येक ठिकाणी असलेल्या गटारी नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचले आहे. परिणामी डासांचे प्रमाणही वाढले आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. गटारींचे बांधकाम करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र आजपर्यंत गटारींचे बांधकाम करण्यासाठी कोणीही लक्ष दिले नाही. येथील नागरिक व महिला मंडळाच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. पण महापालिका प्रशासनाने देखील याची दखल घेतली नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील गटारींचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अन्यथा रास्तारोको करू, असा इशारा रहिवाशांनी पत्रकाद्वारे दिला
आहे.
सदर निवेदनावर वाय. शंभूचे, एम. ए. काळे, विजय पाटील, एम. जी. पुरी, एस. बी. रेडेकर, पी. आर. बुद्दण्णावर, ए. के. भातकांडे यांच्या सहय़ा आहेत.









