प्रतिनिधी/ सातारा
गुड फ्राय डेची शासकीय सुट्टी असूनदेखील सातारा शहर पोलीस ठाण्यात दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी दाखल असलेल्या गुह्यातील संशयित ऍड. गुणरत्न सदावर्ते याची सातारा पोलिसांनी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमधून गंचाडी पकडून साताऱयाला गुरुवारी आणले. रात्री उशिरा त्याचे मेडिकल करुन त्यास तात्पुरत्या कोठडीत ठेवले. शुक्रवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यातून त्यास 11 वाजता न्यायालयात हजर केले. न्यायाधिश स्वाती शेंडगे यांनी सरकार पक्षाचे वकील आणि सदावर्ते याचे वकील यांचे म्हणणे ऐकून घेऊन पोलिसांना तपासाच्या अनुषंगाने दि. 18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे सदावर्ते याचा सातारा पोलिसांकडे दि. 18 पर्यंत पाहुणचार असून दि. 18 रोजी न्यायालय पुढे काय निर्णय देणार याचीच न्यायालयाच्या आवारात चर्चा सुरु होती.
ऑक्टोबर 2020 मध्ये एका टीव्ही चॅनेलवर आयोजित करण्यात आलेल्या डीबेटमध्ये ऍड. गुणरत्ने सदावर्ते हा सहभागी झाला होता. त्याच वेळी त्याने राजघराण्याबाबत बेताल वक्तव्य करताच साताऱयात सातारा शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र निकम यांनी सदावर्ते याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अगोदरच सदावर्ते यास मुंबई पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा व सिल्वर ओकवर दगडफेकीच्या कटाबाबतच्या गुह्यावरुन अटक करुन न्यायालयात हजर केले होते. त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तोच सातारा पोलिसांनी 9 ऑक्टोबर 2020 च्या गुह्यात त्याचा ताबा मागवून गुरुवारी त्याला साताऱयात आणले. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर अटकेची कारवाई केली. सकाळी शहर पोलीस ठाण्यापासून त्याला सुट्टीच्या दिवशीही न्यायालयात सुनावणी करता नेण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुढे चार गाडय़ा मागे चार गाडय़ा अशा ताफ्यात सदावर्तेला जिल्हा न्यायालयात सकाळी 11 वाजता हजर केले.
न्यायाधिशांसमोर दोन्ही पक्षकारांनी मांडली जोरदारपणे बाजू
सहावे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधिश स्वाती शेंडगे यांच्यासमोर ऍड. सदावर्ते यास हजर करण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने ऍड. अंजुम पठाण यांनी तर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ऍड. अजय मोहिते यांनी बाजू मांडली तर ऍड. सदावर्ते याच्या बाजूने तब्बल 5 वकीलांनी बाजू मांडली. त्यामध्ये ऍड. सचिन थोरात, ऍड. सतीश सुर्यवंशी, क्षीतिज रोडे, चिन्मय पंडित आणि प्रदीप भवरे यांचा समावेश होता. दोन्ही पक्ष कारांच्यावतीने बाजू मांडत असताना सरकार पक्षाच्यावतीने ऍड. अंजूम पठाण व मराठा क्रांती मोर्चाचे ऍड. अजय मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगातील करोडो लोक दैवत मानतात. या सर्वांच्या भावना दुखावण्याचे काम सदावर्तेनी केले आहे. सदावर्ते यास चांगले कायद्याचे ज्ञान आहे. तरीही एका टीव्हीवर असलेल्या डीबेटमध्ये कोणाच्या सांगण्यावरुन त्यांनी बेताल वक्तव्य केलेले आहे. त्याला कोणी असे वक्तव्य करायला भाग पाडले. त्याला कोणी स्क्रीप्ट दिली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना वेळ हवा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी जोरदारपणे मागणी करण्यात आली.
तर सदावर्ते याचे वकील ऍड. थोरातांनी जाणीवपूर्वक आमच्या पक्षकारांना त्रास देण्याच्या हेतूने जुना गुन्हा उकरुन काढण्यात आलेला आहे. आमच्या पक्षकारांनी केलेल्या वक्तव्याबाबत आम्ही जाहीर माफी मागतो. परंतु त्यांच्याकडून केलेल्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल केला आहे. त्याकरता पोलीस कोठडीची गरज नाही, असे म्हणणे मांडले. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने भगवान निंबाळकर यांनी दोन वर्ष कोरोना असल्याने याचा तपास करता येत नव्हता. याचा तपास सुरु केला असल्याचे म्हणणे मांडले. तर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांनी सदावर्ते यांनी जाणूनबुजन दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचे म्हणणे मांडले. सर्व बाजू ऐकून घेऊन सहावे तदर्थ न्यायाधिश स्वाती शेंडगे यांनी दि. 18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सदावर्तेच्या भारत माता की जयच्या घोषणा
ऍड. गुणरत्न सदावर्ते याला शुक्रवारी न्यायालयात नेले होते. सकाळी त्याला शहर पोलिसांनी बाहेर काढताना त्याने भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. तसेच न्यायालयातही सुनावणी झाल्यानंतर बाहेर पडल्यावर पत्रकारांच्यासमोरच त्याने भारत माता की जय, वंदे मातरमचा नारा लगावला.
सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त
ऍड. सदावर्ते याच्या सुरक्षेसाठी सातारा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे स्वतः त्यास घेऊन गेले. परंतु सह पोलीस अधीक्षक ऑचल दलाल याही न्यायालयाच्या आवारात होत्या. त्याचबरोबर एलसीबीचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह एक स्ट्रायकिंग फोर्स, एलसीबीची सर्व टीम, सातारा शहरची डीबी, शाहुपूरीची डीबी असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पत्रकारांमध्ये कळवंड
सदावर्तेंचे रिपोर्टींग करण्यासाठी मीडियाची मोठी झुंबड उडाली होती. शहर पोलीस ठाण्यापासून ते न्यायालयाच्या आवारापर्यंत सदावर्तेंच्या गाडीचे कॅमेरे पिच्छा करत होते. सदावर्ते याच्यावरील सुनावणी तब्बल पाऊण तास चालली. ती सुनावणी संपून बाहेर येताना सदावर्तेचा व त्याच्या वकिलांचा बाईट मिळवण्यासाठी पत्रकारांमध्ये कळवंड सुरु झाली. पोलिसांनी काही पत्रकारांना सुनावणीच्या ठिकाणी जाण्यास रोखल्याने पत्रकारांमध्येच कळवंड झाल्याचे पोलिसांनी पाहिले.








