वार्ताहर /सदलगा :
सदलगा नगरपरिषदेचे वसुली कर्मचारी अशोक नेमा हेगडे यांना 9 हजाराची रोख लाच घेताना सापळा रचून धाड टाकून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शिवानंद कुमार करंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बी. एस. नेमगौड, एस. पी. बेळगावी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शरणाप्पा यांनी प्रकरण दाखल करून कारवाई केल्याची माहिती पोलीस अधिकारी सुनिलकुमार एच. यांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी, कारवाईत ए. एस. गुदीगोप्प (एसीबी) यांच्यासह याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुनिलकुमार एच. आणि कर्मचारीवर्गाने गुरुवारी सदलगा नगरपरिषदेवर धाड टाकली. 1998 मध्ये सरकारतर्फे आश्रय योजनेमध्ये लाभार्थीना घरे मंजूर केली होती. यावर 25 हजारांचा सिंडिकेट बँकेचा बोजा चढवलेली नोंद नगरपरिषद कार्यालयात रजिस्टरमध्ये नमूद केली आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये या आश्रय घरावरील सिंडिकेट बँकेचा बोजा, व्याज कमी करण्याचा आदेश दिला आहे. तशा आदेशाची प्रतही तक्रार अर्जासोबत दिली आहे.
हा बोजा, व्याज कमी करण्यासंदर्भात 2017 मध्येच सदलगाचे नगरसेवक अभिजीत पाटील यांनीही या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करून सर्व लाभार्थ्यांचे घराचे उतारे बोजारहित स्वच्छ उतारे द्यावेत, असे लेखीही कळविले होते, असे अभिजीत पाटील यांनी यावेळी सांगितले. असे असतानाही अद्याप अनेक लाभार्थ्यांच्या आश्रय घरांच्या उताऱयावरील बोजा तसाच दाखविलेला असून लाभार्थ्यांकडून हजारो रुपयांची मागणी इथल्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱयांकडून आजतागायत केली जात होती.
4 ऑगस्ट 20 रोजी बोजा कमी करण्यासाठी करंगळे यांनी संबंधित वसुली अधिकारी अशोक हेगडे याना भेटून बोजा कमी करण्यासाठी विनंती करत असताना हेगडे यांनी पंधरा हजार मागितले. नंतर तडजोडीने 9 हजाराची लाच मागितली. ही तक्रार करंगळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (बेळगाव) यांना दिली.
आज 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बी. एस. नेमगौड, एस. पी. बेळगावी यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शरणाप्पा यांनी प्रकरण दाखल करून सुशिलकुमार एच., ए. एस. गोदीगोप्प यांनी 11 वाजता सापळा रचून करंगळेंकडून रोख लाच घेताना संशयित आरोपी अशोक हेगडेंना रंगेहाथ पकडले. पुढे त्याची चौकशी करून संशयिताला न्यायालयात हजर करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.









