प्रतिनिधी / सातारा :
मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सदरबाजारातील जवान हौसिंग सोसायटीत चक्क रानगवा आणि त्याचे पिल्लू नागरिकांच्या दृष्टीस पडले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागास याची माहिती मिळताच वनविभागाने पहाटेपर्यंत प्रयत्न करुन त्या रानगव्यास महादरेच्या डोंगराकडे वळवले.
सदरबाजारात जवान हौसिंग सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर काही नागरिक बाहेर फेरफटका मारायला आले, तेव्हा त्यांना रानगवा अन् त्याचे पिल्लू दृष्टीस पडले. काहींनी लगेच वनविभागाला माहिती कळवली. वनविभागचे उपवनसरंक्षक महादेव मोहिते, वनअधिकारी महेश झांजुर्णे, वनपरीक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण, वनपाल कुशल पावरा, प्रशांत पडवळ, वनरक्षक सुहास भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटेपर्यंत प्रयत्न करून त्यांनी रानगव्यास व त्याच्या पिल्लास कुपर कॉलनीतून सैदापूरमार्गे महादरेच्या डोंगराकडे वळवले.