प्रतिनिधी / सातारा :
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी शहरातील झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काचे घर देण्याकरता आठ वर्षापूर्वी युआयडीएसएमटी योजनेतून शहरात घरकुल योजना आणली. घरकुलाची उभारणी झाली. हक्काचे घर मिळावे याकरता लाभार्थ्यांनी 30 हजार रुपये भरले. मात्र, अद्यापही लाभार्थींना आपले घर मिळाले नाही. लकी ड्रॉ कधी पालिकेच्यावतीने काढण्यात येणार याकडेच 50 जण प्रतिक्षेत आहेत. स्थानिक नगरसेवकांकडे सातत्याने नागरिकांचा पाठपुरावा सुरु असून नगरसेवक विशाल जाधव यांनी याबाबतचे पत्रच मुख्याधिकाऱ्यांना देताच पालिकेच्या हालचाली वाढल्या आहेत.
सातारा शहरात असलेल्या सर्वच झोपडपट्टीतील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे चांगले घर मिळावे या उद्दात्त हेतूने खासदार उदयनराजेंनी त्या काळी युआयडीएसएमटी योजनेतून घरकुल मंजूर करुन आणली. शनिवार पेठ, मंगळवार पेठेतले घरकुल पूर्ण होऊन तेथील लाभार्थींना हवालीही करण्यात आले. परंतु शहरातील काही ठिकाणचे घरकुल बांधून पूर्ण होऊनही त्यांचा ताबा लाभार्थ्याना दिलेला नाही. सदरबझार येथील घरकुलाच्या लाभाची तीच अवस्था आहे. त्याबाबत लाभार्थ्यांकडून घरकुलाची सोडत कधी निघेल याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडे तक्रारी केल्या असून नगरसेवकांनी याबाबतची तक्रार थेट मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली असून त्या अनुषंगाने पालिकेत हालचाली वाढल्या आहेत. मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांना याबाबत विचारणा केली असता 32 जणांना घरकुल वाटपाचे राहिलेले आहे. त्यांची यादी काढून येत्या काही दिवसात सोडत काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









