सेरेब्रल पाल्सीने होता ग्रस्त : वयाच्या 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
मायक्रोसॉफ्ट या दिग्गज कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांच्या मुलाचे निधन झाले आहे. नडेला यांचा 26 वर्षीय मुलगा झैन हा जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त होता. झैनचे निधन सोमवारी झाल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून सांगण्यात आले. सत्या यांच्या तीन अपत्यांमध्ये जेन हा सर्वात मोठा मुलगा होता. नडेला यांना तारा आणि दिव्या या दोन मुली देखील आहेत.
2014 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला यांनी दिव्यांग युजर्सला चांगली सेवा देण्यासाठी डिझाइनिंग प्रॉडक्ट्सवर जोर दिला होता. माझा मुलगा झैनचे संगोपन करताना खूप काही शिकायला मिळाले असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. मागील वर्षी चिल्ड्रन्स हॉस्पिटलने नाडेला यांच्यासोबत मिळून सिएटल चिल्ड्रन्स सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून जैन नाडेला इन्डोव्ड चेअर इन पीडियाट्रिक न्युरोसायन्सची देखील स्थापना केली होती.
चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे सीईओ जेफ स्पेरिंग यांनी झैनच्या निधनानंतर एक संदेश प्रसारित केला आहे. झैनला संगीताचे ज्ञान होते, त्याचे प्रसन्न हास्य आणि कुटुंब आणि प्रियजनांना दिलेल्या आनंदासाठी लक्षात ठेवले जाईल असे त्यांनी म्हटले आहे. सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी संबंधित आजार आहे. यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली, चालण्या-फिरण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.









