प्रतिनिधी/ सातारा
राज्यात सत्ता ब प्रकरणाचा प्रश्न सध्या निकाली लागला, कित्त्येक वर्षापासुन सातारा शहरापासुन जिल्हय़ात प्रलंबित प्रश्न होता. त्यावर अनेक आंदोलने झाली, जिल्हाधिकाऱयांसमोर सुनावण्या ही झाल्या तो प्रश्न निकाली लागला असुन आता त्या जागा संबंधितांच्या मालकीच्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक रहिवाशांकडून समाधान ही व्यक्त करण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्हय़ात एकुण जवळपास 5 कोटी पर्यंतचा महसुल ही जमा झाला आहे.
यापुर्वी ‘सत्ता ब’ अंतर्गत या जागा संबंधित कालावधीत लीजवर म्हणजे भाडे तत्वावर देण्यात येत होत्या. त्यामुळे येथील जमिनीचा 7/12 हा सरकारच्याच नावावर होता. सदरची जमीन संबंधित रहिवाशांच्या नावे करण्यात यावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासुन येथील रहिवाशांकडुन करण्यात येत होती. त्याअनुषगांने सरकारच्या धोरणानुसार संबंधित जागेची सध्याच्या दरानुसार किंमत काढुन त्यापैकी 15 टक्के किंमत भरून सदरची जमीन आपापल्या नावे करुन घेण्यात यावी, असा आदेश पारित करण्यात आला.
त्यानुसार सातारा शहरात ही अनेकांनी संबंधित जागेची 15 टक्के किंमत भरून संबंधित निवास आपल्या नावावर करून घेतले आहे. एकंदरीत आकडेवारी पाहता नोव्हेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्हय़ात 54 हजार 483 स्वे. मी एरियाकरीता 4 कोटी 16 लाख 8 हजार 916 रूपयांचा महसुल जमा झाला आहे. यामध्ये 153 रेशिडेंशियल प्लॉटस् व 1 शेतकी जमीन आहे. या योजनेकरीता आणखीन काही दिवस शिल्लक असून येत्या काही दिवसांमध्ये हा महसुल वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. सातारा शहरातही अनेकांनी सत्ता ब अंतर्गत रक्कम भरून जागा स्वतःच्या नावे करून घेतली आहे.
साताऱयातील ‘सत्ता ब’ च्या एकुण मिळकती
गुरूवार पेठ-59, बुधवार पेठ-8, प्रतापगंज पेठ-32, सदाशिव पेठ-47, रविवार पेठ-109, पंताचा गो-15, मल्हारपेठ-63, माची-6, करंजे-36, बसप्पापेठ-3, कामाठीपुरा- 51, भवानी पेठ-8, गोडोली-34, सोमवार पेठ-15, मंगळवार पेठ-85, शुक्रवार पेठ-4, शनिवार पेठ-40, सरबझार-839, केसरकरपेठ-43, यादोगोपाळ पेठ- 11, व्यंकटपुरा-43, रामाचा गोट-21, चिमणपुरा- 3, दुर्गापेठ-7 व राजसपुरा-9.
जिल्हाधिकाऱयांना लवकरच निवेदन देणार
शासनातर्फे सत्ता ब अंतर्गत जमिनी नावावर करण्याकरीता घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. साताऱयातही अनेकांनी याचा लाभ घेतला आहे. तसेच याकरीताची असणारी अंतिम मुदत 8 मार्च 2022 ही आहे, ती वाढविण्यात यावी. तसेच पुणे, ठाणे विभागात एक खिडकी योजना सुरू केली आहे, त्याप्रमाणे साताऱयातही सदर योजना सुरू करण्यात यावी, याबाबतचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे.
शंकर माळवदे, सातारा








