सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे ज्यांचे हातावर पोट आहे, अशा लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे सातारा शहरातील फेरीवाल्यांना अनुदान देण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी जाहीरपणे केली खरी परंतु, अद्यापही कोणत्याही फेरीवाल्याला अनुदान देऊ केलेले नाही. ही बाब अतिशय लज्जास्पद असून, फेरीवाल्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहा दिवसात हे अनुदान न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा नगरसेवक अविनाश कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीचे सावट सर्वत्र आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे जीवनमान अतिशय गंभीर झालेले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार व नियम 247 मध्ये नमुद दुर्धर रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ज्यांची मोठय़ा प्रमाणावर हानी झाली आहे. त्या व्यक्तीस पालिकेने मान्यता दिली असेल तर भरपाई देता येईल, अशी तरतूद असताना सुद्धा सहा महिन्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी फेरीवाल्यांसाठी 1500 रुपये अुनदान जाहीर केले. परंतु, अद्याप कुठल्याही फेरीवाल्यांना अनुदान दिले गेले नसल्याचे दिसून आले. ही बाब लज्जास्पद असून, फेरीवाल्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे. दहा दिवसात हे अनुदान न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असेही कदम यांनी म्हटले आहे.









