वनखात्याने त्वरित बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरीतील जंगलामध्ये वाघाचा वावर पुन्हा एकदा सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. ठाणे पंचायत क्षेत्रातील सुरला गावातील एका धनगराच्या दोन वासरांवर हल्ला करून वाघाने त्यांना ठार मारून फ्ढडशा पाडल्याची घटना घडली आहे. यामुळे सुरला गावात भीती पसरली असून वनखात्याने सदर वाघाचा त्वरित बंदोबस्त करून त्याला दूर अंतरावर हाकलून लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सुरला गावात डोंगर भागात राहणाऱया देऊ पिंगळे या धनगराच्या दोन वासरावर वाघाने हल्ला करण्याचा प्रकार रविवारी घडला. रविवारी दोन्ही वासरे गोठय़ामध्ये न परतल्यामुळे सोमवारी शोधाशोध केली असता घरापासून अवघ्याच अंतरावर दोन वासरे रक्तबंबाळ अवस्थेत मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले. याची माहिती अभयारण्याच्या परिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकाऱयामार्फत या घटनेचा पंचनामा केल्यानंतर सदर हल्ला वाघांने केल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट झाले आहे. कारण दोन्ही वासरांच्या नरडय़ाला जबर जखम झाली होती. जखमांच्या खुणा खोलवर गेल्यामुळे वाघांच्या दातामुळे या खोलवर जखमा झाल्याचे पंचनामातून स्पष्ट करण्यात आले आहे.
देऊ पिंगळे यांच्या दोन वासरांची वाघाने हत्या केली असून त्यांना तात्काळ मदत देण्याचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर केला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल असे वनखात्याचे परिक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांनी सांगितले.
वाघाचा अधिवास निश्चित कुठे आहे याची स्पष्टपणे माहिती मिळू शकलेली नाही. कारण सध्या सदर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामध्ये कॅमेरे लावणे शक्मय नसल्यामुळे वाघाच्या अधिवास निश्चीत सांगणे अवघड असल्याचे वनक्षेत्र अधिकारी दीपक तांडेल यांनी सांगितले.
धनगरांच्या स्थलांतराचा सरकारचा विचार
धनगर पिंगळे कुटुंबांची घरे घनदाट जंगलामध्ये असून तेथे वन्यपशुंचा सातत्याने वावर होत असतो. तसेच अनेकवेळा विजेची समस्या, मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ता, वाहन सुविधा नाहीत याची दखल घेऊन या कुटुंबीयांचे इतरत्र स्थलांतर करण्यासंदर्भात सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रस्तावाला पिंगळे कुटुंबीयांनी तयारी दर्शविली असून ज्याठिकाणी जागा उपलब्ध आहे त्याठिकाणी सदर कुटुंबीयांच्या स्थलांतर करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे समजते. कुटुंबीयांनी त्याला हिरवा कंदील दिल्याची माहिती हाती आली आहे.









