दरदिवशी 27 बेकऱयांमधून 30 हजार पावांचे उत्पादन : सरकारने आर्थिक योजना सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात 1 डिसेंबरपासून 50 ग्रॅम वजनाचा पाव पाच रुपयांनी विकला जाणार आहे. यामुळे ग्राहकांनी यापुढेही सहकार्य द्यावे, असे आवाहन सत्तरी बेकरी असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. वेळूस सत्तरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश झर्मेकर यांनी सविस्तर माहिती दिली. सरकारने पारंपरिक पाववाल्यांसाठी विशेष योजना जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पिठाचे दर वाढले-कामगार मिळणे दुरापास्त.
प्रकाश झर्मेकर म्हणाले की, सातत्याने पिठाचे दर वाढत आहे. यामुळे दर वाढविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मैदा, लाकूड, कामगार यांच्या दरातही सातत्याने वाढ होऊ लागलेली आहे. यामुळे या व्यवसायात गुंतलेल्या व्यवसायिकांना बँकांचे कर्ज काढावे लागत आहे. सध्या हा व्यवसाय परवडणारा नाही. यापूर्वी हा दर प्रती पाव 4 रुपये होता. त्यामध्ये एक रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. एकेकाळी 50 किलो पिठाच्या पोतीचा दर 90 रुपये होता. त्यामध्ये प्रचंड वाढ होऊन 1400 रुपये आहे. हॉटेलवाल्यांना प्रति पाव 4 रुपये याप्रमाणे विकण्यात येणार आहे. त्यांनी सदर पाव 5 रुपये प्रमाणे विकावा. यापेक्षा जास्त दर काढल्यास ग्राहकांची लूट करीत असल्याचे स्पष्ट होणार आहे, असे असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे .
प्रतिदिनी 30 हजार पावाचे उत्पादन
एकूण 27 बेकऱया सत्तरी तालुक्मयात कार्यरत असून दरदिवशी जवळपास 30 हजार पावाचे उत्पादन होत आहे. यातील तीन हजार सरासरी पाव हॉटेलवाल्यांना पुरविण्यात येत आहेत. तर 27 हजार पाव फेरीवाल्यांच्या मार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाळपईच्या बाजारामध्ये संध्याकाळी सहा वाजल्यापासून पाव उपलब्ध असतात. रात्री 8.30 वाजेपर्यंत ग्राहकांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी असोसिएशतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.









