प्रतिनिधी/ वाळपई
ईद-ए-मिलाद म्हणजे ’ अल्लाह ’चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ’ ईद-ए-मिलादुन्नबी’ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला उत्साहात साजरा केला जातो. सत्तरी तालुक्यातील विविध गावात मशिदी असून या सर्व मशिदीमध्ये नमाज पठाण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी प्रत्येकाला ईद च्या शुभेच्छा देऊन ईद हा सण उत्साहात साजरा केला.
ईद सणाचे औचित्य साधून शीरखुर्मा हा विशिष्ट गोड पदार्थ तयार केला जातो. प्रत्येकाच्या मनामध्ये गोड विचार यावेत व मन पवित्र व्हावे यासाठी हा पदार्थ तयार करून प्रत्येकाला वाटण्यात येतो.
मुस्लिम धर्मामध्ये महमंद पैगंबराचा जन्मदिवस म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. यासाठी जवळपास एक महिना पूर्ण उपास करावा लागतो. यावेळी ध्यान व नमाज पठणातून पैगंबराची भक्ती करण्यात येते. यामध्ये सर्व वयाचे मुस्लिम बांधव भाग घेतात. महिन्याभर उपास करणे म्हणजे अल्लाची सेवा करण्यासारखे आहे. या सणाचे औचित्य साधून उपवास करणाऱ्या लहान मुलांचा मु]िस्लम धर्म संघटनेतर्फे सन्मान केला जातो, असे मोहम्मद खान यांनी सांगितले.
मुस्लिम धर्मासाठी ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. सण साजरा करताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होतो. या आनंदामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. आजही अशाच प्रकारचा सण साजरा करण्यात आला. हिंदू, ख्रिश्चन बांधवांनी मुस्लिम बांधवांच्या घरोघरी भेट देऊन त्यांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या, असे रियाज खान यांनी सांगितले. ईद हा सण म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जातो. हजारो वर्षांपासून अल्लाची सेवा करण्याची संधी उपवास करून प्रत्येकाला प्राप्त झाली आहे. या संधीचा प्रत्येक जण फायदा घेऊन अल्लाची भक्ती करण्यात दंग असतात, असे यावेळी नासीर खान यांनी सांगितले.









