संजीव खाडे / कोल्हापूर
महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली आहे. या विस्तारात काँग्रेसकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कॅबिनेटमंत्रीपदी प्रमोशन मिळणार? अशा बातम्याही प्रसिद्ध आणि व्हायरल होत आहेत. या सर्व चर्चा सुरू असल्या तरी त्यांना प्रदेश काँग्रेसच्या अंतर्गंत सुरू असलेल्या घडामोडींचा आधार आहे. सरकारमध्ये प्रभावी काम करणाऱया मंत्र्यांबरोबर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत योगदान देणाऱया लोकप्रतिनिधी, नेत्यांना बळ देण्याच्या दृष्टीने पक्ष नेतृत्वाने नियोजन सुरू केले आहे. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून प्रमोशन, डिमोशन केले जाणार आहे. त्यासाठी यंत्रणाही कार्यान्वित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
प्रदेश काँग्रेसने राज्यभर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. स्वबळाची भाषा करणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटेले कार्यकर्त्यांना चार्ज करण्याबरोबरच पक्ष बांधणीसाठी आग्रही भूमिका घेत आहेत. काँग्रेसचे काही नेते त्यांच्या जिल्ह्यात शक्तीशाली आहेत. त्यांच्या जबाबदारीतही वाढ करण्यात येणार आहे. राज्यमंत्रिमंडळात असणाऱयाही शक्तीशाली नेत्यांचा सरकार आणि पक्ष यांच्यासाठी सकारात्मक दुहेरी वापर करून घेण्याच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेसमध्ये आखणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची राजकीय ताकद वाढविण्यसाठी प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाने आतापासून पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
सतेज पाटील यांच्या कामगिरीवरही लक्ष
राज्यात काँग्रेसचे विधानसभेत 44 आमदार आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे 6 आमदार आहेत. त्यातील चार विधानसभेवर तर दोन विधानपरिषदेवर निवडून आलेले आहेत. यामध्ये सतेज पाटीलही आहे. त्यांच्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे शून्यावरून 4 आमदारांचा आकडा गाठला. 2014 मध्ये देशात आणि राज्यात काँग्रेसची धुळदाण उडाली असताना सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिका काँग्रेसकडे खेचून आणली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांबरोबर घेत त्यांनी जिल्हा परिषदेतून भाजपला सत्तेपासून दूर केले. गोकुळवर सत्ता आणताना राजकीय चातुर्य दाखविले. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील यांना देताना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करण्याची कल्पकताही दाखविली. स्थानिक स्तरावर पक्ष बांधणी करताना विविध संस्थांवर वर्चस्व निर्माण करणाऱया सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्री, साताऱयाचे काँग्रेसचे संपर्क मंत्री, सिंधुदुर्ग, सांगलीची जबाबदारी, राज्यसरकारमध्ये गृहराज्यमंत्रीपदासह माहिती तंत्रज्ञान, गृहनिर्माण, सांसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण आदी मंत्रालयाची जबाबदारी आहे. ती त्यांनी प्रभावीपणे सांभाळली आहे. 2019 चा महापूर, अतिवृष्टी आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटकाळात आपत्ती व्यवस्थापनाचे केलेले कामही त्यांना ऍडव्हांटेज देणारे आहे. पक्षातील प्रत्येक सेलवर त्यांचा वरचस्मा आहे. सरकारमध्ये आणि स्थानिक स्तरावर प्रभावी कामगिरी करणाऱया निवडक नेत्यांच्या यादीत सतेज पाटील यांचे नाव असल्याने कॅबिनेटपदी बढती मिळू शकते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी नाते
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही सतेज पाटील यांचे नाते आहे. सारथीच्या कोल्हापूरच्या उपकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाटील यांच्या कार्याचा जाहीर गौरव केला होता. मराठा आरक्षणाच्या प्रश्नांत संभाजीराजे आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात संवाद घडवून आणण्यात पाटील यांचा पुढाकार होता. त्यामुळे त्यांना बढती मिळली तर त्यात फारसे आश्चर्यकारक काहीही असणार नाही, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसतात.