विविध नेत्यांसह मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी : सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी गोकाक, अरभावी मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार केला. हे दोन्ही मतदारसंघ त्यांनी गुरुवारी पिंजून काढले. यावेळी त्यांच्यासोबत केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, ए. बी. पाटील, एच. के. पाटील, आमदार अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होते.
भाजपने देशातील जनतेला कशा प्रकारे वेठीस धरले आहे याची माहिती मतदारांना देण्यात आली. प्रचार करताना काही ठिकाणी कॉर्नर सभाही घेण्यात आल्या. त्यावेळी सर्वच नेत्यांनी भाजपवर टीका केली. कोणत्याही परिस्थितीत सतीश जारकीहोळी यांना विजयी करण्याचा निर्धार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला असून सर्व मतदारसंघांमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट
केले.
या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे सांगून गाठीभेटी घेण्यात आल्या. बऱयाच ठिकाणी सुवासिनींनी सतीश जारकीहोळी यांचे औक्षण केले. विजयासाठी आशीर्वाद दिले. जनतेने उत्स्फूर्तपणे सतीश जारकीहोळी यांना पाठिंबा दिला आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांच्या सोबत मोठय़ा संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच मतदार उपस्थित होते.
भाजपवर कडाडून टीका
विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी यावेळी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. भाजपने महागाई वाढवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडेच मोडले आहे. आता जनतेने त्यांचे कंबरडे मोडावे असे आवाहन त्यांनी केले आहे. याचबरोबर डी. के. शिवकुमार यांनीही भाजपवर कडाडून टीका केली. सर्वसामान्य व दलितांना आधार देणारा पक्ष म्हणजे काँग्रेसच आहे. तेव्हा काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रचारावेळी राहुल जारकीहोळी आणि प्रियांका जारकीहोळी यांनीही भाग घेतला होता.









