ऑनलाईन टीम / पुणे :
मला माझ्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी छोटी सतार आणून दिली, त्यानंतर कोणतेच खेळणे त्यांनी मला दिले नाही. आता तू याच सतार नावाच्या खेळण्याशी खेऴायचे असे सांगितले. सतार आणि माझे नात तेव्हांपासूनचे असून आम्ही एकमेकांशी तादात्म्य पावलो आहे. इतकी वर्षे सतार सादरीकरण आणि साधना सुरु आहे परंतू माझ्या मते सतार वादनाची साधना ही चिरंतन प्रक्रिया आहे, असे मत ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांनी व्यक्त केले.
गानवर्धन संस्थेतर्फे सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्यासह त्यांच्या कलाकार कुटुंबियांनाआज ‘स्वरगंधा सांगितिक कुटुंब पुरस्कार’ सिम्बाॅयोसीस शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रमुख पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देतांना उस्ताद उस्मान खान बोलत होते. निवृत्त प्राध्यापक नारायणराव टिळक यांच्यातर्फे दिवंगत पत्नी गायिका स्वरगंधा टिळक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार पुरुस्कृत करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना सतारवादक उस्ताद उस्मान खान म्हणाले की, भारतीय शास्त्रीय संगीत आणि आध्यात्म यांच्यात अद्वैत असून ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. संगीताद्वारे आत्म्याशी संवाद सुरु असतो. त्यामुळे संवाद हा सुर-ताल-लयीत झाला पाहिजे. संगीतात कर्कश्यता असेल तर ते शरीर डोलवू शकते परंतू आत्मा आणि मनाला डोलवू शकत नाही.
यावेळी बोलताना डॉ. शां.ब. मुजुमदार म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजलेला एक सतार वादक कलाकार पुण्यात येऊन स्थायिक झाला, ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, ज्या प्रमाणात पुणेकरांनी त्यांना स्वीकारायला हवे होते, त्या प्रमाणात त्यांना स्वीकारले नाही, ही खंत व्यक्त करावीशी वाटते. ते दुर्लक्षित राहिले ही खेदाची बाब आहे. संगीत क्षेत्रात एवढे योगदान दिलेल्या व्यक्तीला शासनाने पद्म पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी मी वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर करणार आहे. मला पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे, हा पुरस्कार हस्तांतरीत करण्याची मुभा असती, तर हा पुरस्कार मी उस्ताद उस्मान खान यांच्याकडे हस्तांतरीत केला असता. नवीन शैक्षणिक धोरणात मिळालेल्या लवचिकतेमुळे पुण्यातील संगीताला वाहिलेल्या सर्व संस्थांना संगीत ज्ञानदानात कसे सामावून घेता येईल, यादृष्टीने माझे प्रयत्न असतील. पुण्यातील संगीत, नृत्य, गायन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना दीर्घ परंपरा असून नवीन शैक्षणिक धोरणाबरोबर याची सांगड घालून ती परंपरा भविष्यातही सुरू राहिल, याबाबत माझा कटाक्ष असेल.









