वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये व्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्राला प्रारंभ झाल्यानंतर आता अखिल भारतीय विश्व मुष्टियुद्ध मंडळातर्फे 26 मार्च रोजी सतनाम सिंग आणि अमेय नितीन यांच्यात फेदरवेट वजन गटातील जेतेपदासाठी लढत आयोजित केली आहे.
भारतीय मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडियर पी. के. मुरलीधरन राजा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दिल्लीमध्ये व्यावसायिक मुष्टियुद्ध क्षेत्रातील ही ऐतिहासिक लढत म्हणून ओळखली जाईल. अखिल भारतीय विश्व मुष्टियुद्ध मंडळाच्या फेदरवेट गटातील जेतेपदासाठी सतनाम सिंग व अमेय नितीन यांच्यातील ही लढत चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. जागतिक मुष्टियोद्धय़ांच्या फेदरवेट वजन गटातील मानांकनात पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये अमेय नितीनचा समावेश आहे. तर बँटमवेट गटात भारताचा सतनाम सिंग टॉप सिडेड म्हणून ओळखला जातो. देशामध्ये मुष्टियुद्ध क्षेत्राला प्रोत्साहन अधिक लाभावे, यासाठी व्यावसायिक लढती यापुढे आयोजित केल्या जातील, अशी माहिती संयुक्त व्यावसायिक मुष्टियुद्ध मंडळाचे सहनिर्माते अनिरुद्ध फाटक यांनी दिली. हौशी मुष्टियुद्ध क्षेत्रामध्ये या दोन्ही मुष्टियोद्धय़ांनी आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. अमेय नितीनने आपल्या वैयक्तिक मुष्टियुद्ध कारकीर्दीत 11 व्यावसायिक लढतीत 7 लढती जिंकल्या असून 4 लढती गमावल्या आहेत. सतनाम सिंगने डब्ल्यूबीसी राष्ट्रीय मुष्टियुद्ध 126 पौंड वजन गटातील जेतेपद स्वतःकडे राखले आहे. भारतामध्ये यापूर्वी म्हणजे 2021 च्या उन्हाळी मोसमात व्यावसायिक मुष्टियुद्ध लढत आयोजित केली होती.









