हिंडलगा कारागृहात चिमुरडींचे बारसे अन् वाढदिवस : रुक्ष वातावरणात आनंदाची झुळूक : कारागृहाचे अधीक्षक कृष्णकुमार यांचा पुढाकार

प्रतिनिधी /बेळगाव
क्षणिक संतापाच्या भरात गुन्हा घडतो आणि कारावास भोगावा लागतो व आयुष्याची परवड होते. परंतु, यामध्ये त्यांच्या मुलांचा काहीच दोष नसतो. कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा, याचा निर्णय आपल्या हाती नसतो. नेमका हाच विचार करून हिंडलगा कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी कारागृहात एका चिमुरडीचा वाढदिवस आणि एका तान्हुलीचे बारसे असा सोहळा हौसेने साजरा केला आणि सतत करडय़ा नजरेने व कडक शिस्तीने वावरणारे अधिकारीसुद्धा या सोहळय़ाने भारावून गेले. इतकेच नव्हे तर कडक वर्दीतील अधिकाऱयांनासुद्धा माणसांच्या भावभावनांची जाणीव असते आणि त्यांच्या मनात मायेचा ओलावा झिरपत असतो, याचीही प्रचिती उपस्थितांना आली.
कृष्णकुमार यांनी निरागस आणि निष्पाप बाळांचा विचार करून हा सोहळा आयोजित केला आणि योगायोगाने त्या ठिकाणी पोहोचलेल्या ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर यांना त्या बाळाच्या नामकरणाचा मान त्यांनी दिला. कारागृहाचे विद्यमान अधीक्षक कृष्णकुमार कारागृहामध्ये कैद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयोग राबवत आहेत. याच अनुषंगाने आज अनेक कैदी विविध कौशल्याची कामे शिकून स्वावलंबी झाले आहेत. कारागृहातच असलेल्या एका जोडप्याच्या लहानग्या मुलीचा सोमवारी वाढदिवस आहे, हे त्यांना समजले. शिवाय कैदी असलेल्या एका मातेने एका तान्हुलीला जन्म दिला असून तिला तीन महिने पूर्ण झाले आहेत, अशी माहितीही त्यांना मिळाली.
या दोन्ही लहानग्या बाळांबद्दल त्यांना कणव आली. आईवडील गुन्हेगार किंवा दोषी असू शकतात, परंतु मुलांचा त्यामध्ये काय दोष? त्यांनी आनंदाला पारखे होऊ नये, शिवाय गुन्हा करून पश्चाताप पावलेल्या आईवडिलांनासुद्धा थोडाफार आनंद मिळावा, या हेतूने त्यांनी वाढदिवस आणि बारसे साजरे करण्याचे ठरविले.
अर्थातच, दोन्हीची तयारी सुरू झाली. पाळण्याची ऑर्डर दिली गेली. कारागृहाच्याच एका बराकीमध्ये फुगे लावले गेले. महिला कैद्यांच्या साडय़ांचे पडदे झाले. ‘हॅप्पी बर्थ डे’ अशी अक्षरे लावण्यात आली. केक मागविण्यात आला आणि सर्व महिला कैद्यांच्या उपस्थितीत वाढदिवस आणि बारसे साजरे झाले.
कारागृहातील त्यातल्या त्यात वयस्कर असलेल्या महिलांनी बारशाचा पाळणा म्हटला. मागविण्यात आलेल्या खास महागडय़ा लाकडी पाळण्यामध्ये तान्हुलीला ठेवण्यात आले आणि एका कामासाठी त्या ठिकाणी पोहोचलेल्या रोमा ठाकुर यांना त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली आणि त्यांनाच बाळाचे नाव ठेवण्याचा मान दिला. ‘वैष्णवी’ असे तिचे नामकरण करण्यात आले. शिवाय एका जोडप्याच्या बाळाचा वाढदिवस साजरा करताना कृष्णकुमार यांनी तिला आपल्या कडेवर घेऊन तिच्यासमवेत केक कापला. या दोन्ही मुलींना रोमा ठाकुर यांनी नवीन फ्रॉक आणि उबदार स्वेटर भेट स्वरुपात दिले. शिवाय त्या बाळांच्या आईची श्रीफळाने ओटीही भरली.
आपल्या हातून चूक झाली, परंतु आपल्या बाळांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, असे तेथील प्रत्येक कैद्याला वाटते. त्यामुळे अधीक्षक कृष्णकुमार यांनी कारागृहासारख्या दगडी भिंतीने बंदिस्त आणि नकारात्मक वातावरणामध्ये सकारात्मक बदल घडवत हा सोहळा साजरा केला आणि पालकांच्या चेहऱयावर आनंदाचे, कृतज्ञतेचे समाधान पसरले. त्या जोडप्यासह उपस्थित सर्वांनीच कृष्णकुमार यांना मनापासून धन्यवाद दिले. याप्रसंगी साहाय्यक उपअधीक्षक शहाबुद्दीन, जेलर अभिषेक एच. एन., राजेश धर्मट्टी व बसवराज बजंत्री उपस्थित होते.
स्वतःच्या पायावर उभे करायचेय!
कैद्यांमध्ये मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. कैद्यांना टेलरिंग, तंबू तयार करणे, सुतारकाम, शेती याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. लवकरच महिला कैद्यांसाठी बेकरी पदार्थ व खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कारागृहातून बाहेर पडलेल्या प्रत्येक कैद्याला आपल्या हिमतीवर अर्थार्जन करता यावे, अशी कृष्णकुमार यांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने अनेक स्तुत्य उपक्रम ते राबवतात.








