फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

प्रतिनिधी /बेळगाव
श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बहरली असून नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. नागपंचमी आणि श्रावणी शुक्रवार एकाच दिवशी आल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी दिसत आहे. चिवडय़ाचे पोहे, रवा, चिरमुरे, लाहय़ा, शेंगदाणे, फुटाणे यासह अनेक गोष्टींची खरेदी जोमाने सुरू आहे. नागपंचमीला नागमूर्ती पुजविण्याची प्रथा असल्याने बाजारात रंगीबेरंगी नागमूर्ती दाखल झाल्या आहेत.
तसेच श्रावणसरींसोबत आनंद देणारा नागपचंमी सण साजरा करण्यासाठी मुली, सुना-माहेरवाशीणी उत्सुक झाल्या आहेत. बाजारपेठ नव्या साडय़ा, दागिने, बांगडय़ा, मेंदी व विविध सौंदर्यप्रसाधनाने सजली आहे. उंच झोके घेण्यासाठी मोठय़ा झोक्मयांच्या बांधणीची लगबगही सुरू झाली आहे.
फराळाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. चिवडय़ाचे पोहे 60 रुपये किलो, लाहय़ा 10 रुपये लिटर, चिरमुरे, गुळ, फुटाणे 80 ते 100 रुपये किलो व शेंगदाणे 110 ते 120 रुपये किलोप्रमाणे विक्री करण्यात येत आहेत. कोरोनाचे संकट जरी असले तरी नागरिक उत्साहाने यावषी सण साजरा करणार असल्याचे दिसून येत आहे.
नागमूर्तींची विक्री सुरू
नागपंचमी सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने ठिकठिकाणी नागमूर्तींची विक्री सुरू आहे. 15 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत विक्री सुरू असली तरी मोठय़ा नागमूर्ती 200 रुपयांपर्यंत विक्री करण्यात येत आहेत. श्रावणी शुक्रवारनिमित्त गौरीमुखवटे उपलब्ध असून त्यांची किंमत 600 रुपये जोडी अशी आहे. फळांनाही मागणी वाढली असून 60 ते 100 रुपयांपर्यंत 5 फळांची विक्री करण्यात येत आहे.









