बुस्टर डोसच्या उद्दीष्ट पुर्ततेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सक्रीय; आगामी सण समारंभापूर्वी अधिकाधिक लोकांना डोस देण्याचे नियोजन; 23 लाख 8 हजार 616 नागरीकांना लसीकरणाचे उद्दीष्ट
कृष्णात चौगले कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिह्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. जिह्यातील 94 टक्के नागरीकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून 80 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. आता हे दोन्ही डोस न घेतलेल्या नागरीकांना लस देऊन संरक्षित करण्याबरोबरच 23 लाख 8 हजार 616 लोकांना ‘बुस्टर डोस’ (तिसरा) देण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ‘मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. आगामी सणांमध्ये होणारी गर्दी गृहित धरून लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱयांची बैठक घेऊन उद्दीष्टपुर्तीचा कालावधी निश्चित केला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात घातलेले सर्व निर्बंध शिथिल केल्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिह्याचे कोविड रुग्ण वाढीचे प्रमाण राज्य व देशाच्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. हे जरी दिलासादायक असले तरी आगामी काळात गौरी-गणपती, दसरा, दिवाळी या सणांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. बाजारपेठा, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, दुकाने, मॉल्स आदी ठिकाणे गजबजणार आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंध सूचनांची अंमलबजावणी व कार्यवाही करण्याची गरज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्पष्ट केले. ताप, सर्दी, खोकला अशी फ्ल्यू सदृश लक्षणे असण्याऱया रुग्णांनी तात्काळ आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन डॉ. साळे यांनी केले आहे.
लसीकरण जलद गतीने पूर्ण करण्याचे नियोजन
कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे शासनाने सर्व निर्बध नुकतेच रद्द केले आहेत. त्यामुळे आगामी गौरी-गणपती, दसरा आणि दिवाळीचा सण निर्बंधमुक्त झाल्यामुळे मोठय़ा प्रमाणात लोक एकत्र येणार आहेत. परिणामी पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवार जिह्यातील जास्तीत जास्त नागरीकांना बुस्टर डोस देऊन संरक्षित करण्याचे आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर शहरासह जिह्यातील 2 लाख 6 हजार 482 म्हणजेच केवळ 9 टक्के लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. उर्वरित 91 टक्के लोकांना लस देण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन लसीकरण जलद गतीने पूर्ण करण्याचे नियोजन केले जाणार आहे.
23 लाख 8 हजार 616 लोकांना दिला जाणार ‘बुस्टर डोस’
जिह्यातील 18 वर्षावरील 23 लाख 8 हजार 616 नागरीकांना बुस्टर डोस देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी 2 लाख 6 हजार 482 लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. यामध्ये आजरा तालुक्यातील 11 टक्के, भुदरगड 7, चंदगड 7, गडहिंग्लज 8, गगनबावडा 7, हातकणंगले 7, कागल 8, करवीर 8, पन्हाळा 8, राधानगरी 10, शाहूवाडी 9, शिरोळ 7, कोल्हापूर मनपा क्षेत्र 15 असे एकूण 9 टक्के नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
जिह्यातील बुस्टर डोसचे उद्दीष्ट
आजरा 67 हजार 151, भुदरगड 84 हजार 969, चंदगड 98 हजार 585, गडहिंग्लज 1 लाख 33 हजार 532, गगनबावडा 19 हजार 259, हातकणंगले 4 लाख 82 हजार 961, कागल 1 लाख 51 हजार, करवीर 3 लाख 8 हजार 819, पन्हाळा 1 लाख 48 हजार 976, राधानगरी ा1 लाख 16 हजार 541, शाहूवाडी 95 हजार 568, शिरोळ 2 लाख 14 हजार 241, कोल्हापूर मनपा क्षेत्र 3 लाख 87 हजार 13 असे एकूण 23 लाख 8 हजार 616 लोकांना बुस्टर डोस देण्याचे आरोग्य विभागाचे उद्दीष्ट आहे.