वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील महागडी कार निर्मिती करणारी कंपनी म्हणून ओळख असणाऱया जर्मनीच्या ऑडी कंपनीला ओळखले जाते. ऑडी आता आगामी काळात येणाऱया सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमिवर विक्री वाढविण्यासाठी विविध टप्प्यावर प्रयत्न करणार आहे. कोरोनाने आधीच व्यवसाय सुस्तावलेला असून आता अनलॉकनंतर व्यवसाय काही प्रमाणात आता सावरत आहेत. परंतु यामध्ये आणखीन सुधारणा होण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.
देशातील विविध ठिकणच्या शोरुममध्ये वाहन खरेदीमध्ये तेजी पहावयास मिळत आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करुन ग्राहक जोडण्यावर भर दिला जाणार असल्याचे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो यांनी यावेळी म्हटले आहे. कारण आता सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. हीच बाब लक्षात घेत याची तयारी करून सर्व ती आवश्यक उपाययोजना कंपनी आखणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
ग्राहकांची संख्या कोविड19 च्या अगोदरच्या पातळीवर पोहोचलेली नाही आहे. परंतु कंपनीने आपली अपेक्षा मजबूत ठेवत सणाच्या दिवसांमध्ये कंपनी ग्राहकांची संख्या वेगाने वाढविण्यावर भर देणार असल्याची माहिती दिली आहे.









