अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक : मतदान पार पडले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीकरिता मंगळवारी मतदान पार पडले आहे. परंतु सट्टेबाज आतापासूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावरून आश्वस्त दिसून येत आहेत. ब्रिटनमध्ये ट्रम्प यांच्या विजयासंबंधी एका माजी ब्रिटिश बँकरने तर सुमारे 5 दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे 37 कोटी रुपये) सट्टा लावला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय सट्टा असल्याचे मानले जात आहे. परंतु आतापर्यंतच्या मतदानापूर्व सर्वेक्षणांमध्ये ज्यो बिडेन हेच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय झाल्यास या सट्टेबाजाला किमान 15 दशलक्ष डॉलर्सची रक्कम मिळणार आहे. स्थिती बदलून डोनाल्ड ट्रम्प प्रतिस्पर्धी उमेदवार बिडेन यांना पराभूत करतील, अशी अपेक्षा सट्टेबाजांना वाटत आहे.
अमेरिकेत सट्टेबाजी अवैध
अमेरिकेत राष्ट्रीय किंवा स्थानिक निवडणुकीत सट्टेबाजी अवैध आहे. याचमुळे सट्टेबाजीशी संबंधित सर्व हालचाली विदेशी संकेतस्थळांवर होत आहेत. अवैध असल्याने अमेरिकेत लोक छुप्या पद्धतीने यात सामील होत आहेत. ट्रम्प यांच्यावर पैसा लावणाऱयांना 90 पट अधिक लाभ मिळत असल्याचे दिसून येत असल्याचे एएफपीच्या अहवालात नमूद आहे.
सट्टेबाजांनी मांडलेली वस्तुःस्थिती
ट्रम्प यांच्या समर्थनार्थ लोक अधिक आहेत, यात कुठलाच संशय नाही. ट्रम्प यांच्या बाजूने आतापर्यंत अब्जावधी रुपये पणाला लागले आहेत, असे एका ब्रिटिश सट्टेबाजाने म्हटले आहे. तर कोरोना महामारीमुळे सट्टेबाजीत आलेल्या मंदीनंतर आता पुन्हा ट्रम्प यांच्या बाजूने होत असलेल्या कमाईमुळे उलाढाल वाढल्याचे आयर्लंडमधील एका सट्टेबाजाने सांगितले आहे.
प्रांतनिहाय चित्र
अमेरिकेतील 9 प्रांतांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला आघाडी मिळू शकते. इंडियाना, दक्षिण कॅरोलिना, टेनेसी, ओक्लाहोमा, लोवा, मिसिसिपी, मिसौरी, केंटुकी आणि पश्चिम वर्जीनियामध्ये त्यांचे पारडे जड आहे. या प्रांतांमध्ये ट्रम्प यांना आघाडी मिळणे निश्चित मानले जात आहे.
बिडेन यांच्या बाजूचे प्रांत
सर्वेक्षणात बिडेन यांच्या डेमोक्रेटिक पार्टीला रिपब्लिकन पार्टीपेक्षा काही प्रांतांमध्ये आघाडी मिळणार असल्याचे म्हटले गेले आहे. यात कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन स्टेट, मॅसाचुसेट्स, ओरेगॉन, इलियोनिस, न्यु जर्सी, कोलारेडो आणि वर्जीनिया सामील आहे. तेथे मोठय़ा फरकाने बिडेन आघाडीवर राहणार असल्याचे सांगण्यात येते.
स्विंग स्टेट
बिडेन आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत असणारे काही प्रांत अमेरिकेत आहेत. हे प्रांतच यंदाच्या निवडणुकीत नवा अध्यक्ष निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. यात जॉर्जिया, टेक्सास, ओहियो, विस्कोनिस, मिनिसोटा, मिशिगन, पेन्सिलविनिया, फ्लोरिडा, एरिझोना आणि नेवादा प्रांत सामील आहे.









