प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी क्षेत्री म्हणजेच श्री क्षेत्र सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने गुरुवार 17 ते 25 फेब्रुवारी दरम्यान या वर्षीचा दासनवमी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दासबोध पारायण प्रवचन व कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.
दासनवमी उत्सव कार्यक्रमांमध्ये दररोज सकाळी आठ ते साडे दहा या वेळेत दासबोध पारायण वाचन होणार असून त्यासाठी नितीनबुवा जोशी रामदासी व रसिकाताई ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पारायण 25 फेब्रुवारीअखेर संपन्न होणार आहे. 25 फेब्रुवारीला दासबोध पारायणाची सांगता आणि श्री दासनवमीचा महाप्रसाद वितरण होणार आहे.
दरम्यान, दि. 17 पासून सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळेत डॉ. अजित कुलकर्णी यांची दोन दिवस व दि. 19 पासून श्री गुरूनाथ महाराज कोटणीस यांची सहा दिवस प्रवचने सादर होणार आहेत. दि 17 पासून दि. 23 पर्यंत सायंकाळी चार ते सहा या वेळेत समर्थभक्त मकरंद बुवा रामदासी हे कीर्तन सेवा करणार आहेत. कीर्तन सेवेमध्ये मकरंद बुवा यांना संवादिनी साथ सुशील गदरे व तबला साथ विश्वास जोशी यांची लाभणार आहे.
या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष ऍड. डी. व्ही. देशपांडे, खजिनदार समर्थभक्त अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी व कार्यवाह समर्थभक्त योगेश बुवा पुरोहित रामदासी यांनी केले आहे.









